चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : ‘मिशन लोटस’ राबविण्यासाठी चिपळुणातील भाजप परिवाराने राजकीय डावपेचांना सुरुवात केली आहे. त्यानुसार आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत युती करण्याची छुपी तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. त्यासाठी चिपळूण मतदारसंघात शिंदे गटात कोण सहभागी होणार यावर लक्ष ठेवले जात आहे.

राज्य शासनाने नगराध्यक्षपद जनतेतून निवडणूक देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी चिपळुणातील भाजप परिवार सज्ज झाला आहे. त्या अंतर्गत चिपळुणात मिशन लोटस अभियान राबविण्याकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत. गतवेळेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्याचा फायदा न.प.वर सत्ता मिळविण्यात झाला होता. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा न.प.वर सत्ता मिळविण्यासाठी मिशन लोटस अंतर्गत भाजपने राजकीय डावपेचांना सुरुवात केली आहे. यावेळी मिशन लोटस अंतर्गत राज्यातील एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशी सत्ता सूत्रे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही वापरण्याच्या हालचाली आणि डावपेच आखले जात आहेत.

सद्य:स्थितीत चिपळुणात ठाकरे समर्थक गटाच्या मूळ शिवसेनेची ताकद मोठी आहे. तरीदेखील राज्यातील आघाडी सत्तांतरानंतर ना. शिंदे गटामध्ये मूळ सेनेतील काही प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक छुप्या पद्धतीने कार्यरत आहेत. प्रत्यक्षात मूळ शिवसेनेत वावरत असल्याचे दाखवून अंतर्गत राजकारणात शिंदे गट बळकट करून सक्रिय करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व घडामोडींवर चिपळुणातील भाजप परिवाराकडून लक्ष ठेवले जात आहे. सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यावर छुप्या पद्धतीने कार्यरत असलेला शिंदे गट सक्रिय झाल्यास त्याच्यासोबत राज्यातील शासनाप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करण्याची तयारी परिवाराने सुरू केली आहे. शहरात मिशन लोटस अंतर्गत जास्तीत जास्त प्रभागात भाजपचे नगरसेवक वाढविण्याच्या दृष्टीने शिंदे गटाला नगराध्यक्ष व भाजपकडे उपनगराध्यक्ष पदासह जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या, असे सूत्र राबविले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या हालचाली

भाजपमध्ये नगराध्यक्षपदासाठी सद्य: स्थितीत माजी नगरसेवक विजय चितळे, शहर अध्यक्ष आशिष खातू, माजी नगरसेवक बाबू तांबे, माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने हे प्रमुख दावेदार आहेत. प्रत्येक इच्छुकाकडून सुरुवातीला आपापला प्रभाग मजबूत करण्याबरोबरच शहरातील अन्य प्रभागातील हितचिंतक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शिंदे गटात सक्रिय होणार्‍या सेनेतील काही शिवसैनिक पदाधिकारी यांच्याशी काही इच्छुकांनी राजकीय संधान बांधण्यास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here