
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हे आगामी आठ दिवसांत कळेल, असे सांगून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यमंत्र्यांचा विस्तार कधी होणार, याचेही संकेत दिले. आठ दिवसांत म्हणजे अनंत चतुर्दशीनंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होतील, असे ना. सामंत म्हणाले.
उद्योगमंत्री उदय सामंत गणेशोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी दौर्यावर होते. या दौर्यात त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील अनेक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेतले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्याही घरी जाऊन गणपतींचे दर्शन घेतले. त्यामुळे त्यांचा गेल्या वर्षभरात तिसरा जनसंपर्क दौरा झाला आहे. नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीतील सदस्यांचा कालावधी संपण्यापूर्वी आणि कालावधी संपल्यानंतर ना. उदय सामंत यांनी प्रभाग, गण, गटनिहाय बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी झालेल्या विकासकामांची माहिती दिली. त्यानंतर आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांत पुन्हा जनसंपर्क दौरा झाला. अशा पद्धतीने इतर कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेत्यांनी लोकांच्या गाठीभेटी केलेल्या नाहीत.
रविवारी श्री रत्नागिरीचा राजा गणेशोत्सव मंडपात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी येत्या आठ दिवसांत मी कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री होईन हे कळेल, असे सांगितले. यावरून अनंत चतुर्दशीनंतर पालकमंत्री नियुक्त्या आणि पर्यायाने राहिलेले राज्यमंत्री नेमले जातील, असे मानले जात आहे. कारण काही राज्यमंत्र्यांनाही पालकमंत्री नेमावे लागणार आहे.
कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार होण्यापूर्वी आमदार म्हणून ते रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी कॅरम स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी कॅरम असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी अशा स्पर्धांना कंपन्या सहकार्य करत नसल्याची तक्रार केली होती. यावर ना. सामंत यांनी ‘आठ दिवस वाट पाहा, कंपन्या सहकार्यासाठी रांगा लावतील’, असे कोड्यात सांगितले होते.
त्यावेळी त्यांना उद्योग मंत्रालयच मिळणार असा तर्क लावण्यात आला आणि तो खराही ठरला. त्यामुळे आठ दिवसाच्या विधानावरून राज्यमंत्र्यांच्या नियुक्त्या अनंत चतुर्दर्शीनंतर होणार असल्याचे तर्क लावले जात आहेत.
हेही वाचा