गुहागर; शहर पुढारी वृत्तसेवा : शिवसेना फुटीनंतर गुहागरातील शिवसैनिक शिंदे गटात जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी गुहागर दौर्‍यावर येऊन येथील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतल्याने गुहागरातही शिंदे गट सक्रिय होण्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या काही दिवसातच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

रविवारी गुहागरातील एकही कार्यकर्ता शिंदे गटात जाणार नाही, असा दावा तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी केला होता. मात्र, शिवसेनेतील एक गट आ. भास्कर जाधव यांच्यावर पूर्वीपासूनच नाराज आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर हा गट योग्य संधीची वाट पाहत होता. तोपर्यंत जाहीररित्या या गटाने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. ना. सामंत यांच्या भेटीमुळे या गटाला बळ मिळाले आहे. आता या संधीचा फायदा घेऊन उद्योगमंत्री सामंत आणि ज्येष्ठ नेते (शिंदे गट) रामदास कदम गुहागरातही शिंदे गटाचे प्राबल्य कसे वाढवितात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाडचे भरत गोगावले, दापोलीचे आ. योगेश कदम व रत्नागिरीचे आ. उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात केवळ गुहागरचे आ. भास्कर जाधव आणि राजापूरचे आ. राजन साळवी हे दोन आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिले आहेत. दोन आमदार शिंदे गटात गेल्यामुळे जिल्ह्याची संघटनात्मक मोठी जबाबदारी आता भास्कर जाधव यांचावर येऊन पडली आहे. ठाकरे यांनी आ. जाधव यांची नुकतीच नेतेपदी निवड केली आहे. आ. जाधव गुहागर विधानसभा व अन्य मतदार संघात मेळावे घेत शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्याचा व तेथील शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्याशी जोडून ठेवण्याचा प्रयत्न आ. जाधव करत आहेत. शिवसेनेत आ. जाधव यांच्यासारखा लढवय्या नेता कोणी नाही. त्यामुळे जाधव मिळालेल्या पदाला योग्य न्याय देतील, असा तालुक्यातील शिवसैनिकांना विश्वास आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here