
गुहागर, पुढारी वृत्तसेवा : गुहागर पोलीस स्टेशन चे पोलीस कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे समुद्रात बुडालेल्या नौकेतील तिनही मच्छिमारांना वाचविण्यात यश आले. शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी वेळणेश्र्वरच्या समुद्रात मेरुमंडल येथील खडकाळ भागात एका लाटेने कोंडकारुळची मच्छीमार नौका (पगार) उलटली होती.
गुहागर तालुक्यातील कोंडकारुळचे तीन मच्छीमार यशवंत गंगाजी झर्वे (वय ५८, रा. जांभुळवाडी), संजय लक्ष्मण जागकर (४०, रा. लक्ष्मीनगर) आणि विलास लक्ष्मण जागकर (६२, रा. नामदेववाडी) हे शुक्रवारी दुपारी १ वाजता छोटी मच्छीमार नौका (पगार) घेवून वेळणेश्र्वरच्या दिशेने मच्छीमारीसाठी निघाले होते. दरम्यान त्यांचा पगार वेळणेश्र्वर येथील मेरु मंडल या खडकाळ भागात आला. वाऱ्यामुळे नेहमीपेक्षा उंच लाटा येत होत्या. अशाच एका लाटेने पगार ही नौका अचानक उलटी झाला. तिनही मच्छीमार समुद्रात पडले. त्यांनी आरडाओरडा सुरु केला.
अनंत चतुदर्शीच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस कादवडकर त्यांच्या काही सहकाऱ्यांसह समुद्रावर उपस्थित होते. समुद्रात मच्छीमारांनी केलेला आरडाओरडा कादवडकरांच्या लक्षात आला. तातडीने त्यांनी वेळणेश्र्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर यांना ही बाब सांगितली. धोपावकर यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. आणि या तिनही मच्छीमारांना सुखरुप समुद्रकिनाऱ्यावर आणले. कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे आणि वेळणेश्र्वरचे सरपंच व ग्रामस्थ यांनी केलेल्या मदतकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मच्छीमारांना समुद्रकिनाऱ्यावर आणल्यानंतर समुद्रात बुडालेला पगार काढण्याचे प्रयत्न स्थानिक मच्छीमारांनी सुरु केले आहेत. मात्र छोटी नौका बुडाल्याने या मच्छीमारांचे सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे.
हेही वाचलंत का?