रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी रेल्वे गाड्या विद्युत इंजिनसह कधी धावणार याबाबत असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावरून 15 सप्टेंबरपासून प्रवासी रेल्वे गाड्या टप्प्याटप्प्याने डिझेल ऐवजी विद्युत इंजिनवर चालविल्या जाणार आहेत. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता खर्‍या अर्थाने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त प्रवासासाठी सज्ज झाल्या आहेत.

कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण मागील सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेने हे पूर्ण केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्वे मंत्र्यांनीही कोकण रेल्वेच्या कामगिरीची प्रशंसा केली होती. मात्र, सहा महिने होऊनही विद्युतीकरण पूर्ण झालेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावर मालगाड्या आणि एकमेव प्रवासी गाडी सोडली तर सर्व प्रवासी गाड्या डिझेल इंजिनसह धावत आहेत. विद्युतीकरणाच्या कामापैकी सर्वात महत्वाच्या असलेल्या सब-स्टेशन्सची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रवासी रेल्वे गाड्या विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वेला लांबणीवर टाकावे लागले होते. मात्र, आता या कामातील रत्नागिरी येथील टीएसएस (ट्रॅक्शन सबस्टेशन) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने रेल्वेने दि. 15 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विजय वर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी रेल्वे गाड्या विजेवर चालवण्याच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार दि. 15 सप्टेंबरपासून दादर-सावंतवाडी तुतारी तसेच मंगला एक्स्प्रेस विद्युत इंजिनसह धावणार आहेत. त्यापाठोपाठ मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस तसेच दिवा-सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्स्प्रेस या प्रवासी गाड्या दि. 20 सप्टेंबरपासून विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस पुढील महिन्यात विजेवर

या मार्गावरून जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस दि. 15 ऑक्टोबरपासून तर मुंबई- मेंगलोर एक्सप्रेस 1 जानेवारी 2023 पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. या संदर्भात रेल्वे सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई सीएसटी ते करमाळी दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस 15 ऑक्टोबर 2022 पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. याचबरोबर उर्वरित गाड्याही टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here