
सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत अमिषे दाखवून फोडाफोडी करण्यापेक्षा अन्य पक्षांत असलेल्या आपल्या हितचिंतक व विरोधी पक्षात असताना मदत केलेल्या नातेवाईकांना पहिले शिंदे गटात घ्यावे, असा टोला शिवसेना सचिव, खा. विनायक राऊत यांनी मारला आहे.
मालवण-तळगाव येथील निवासस्थानी खा. राऊत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे जनतेत प्रचंड रोष आहे. शिंदे गटात गेलेले आमदार पुन्हा शिवसेनेत येणार नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत अनेक आमदार घडले आहेत. त्यातील आज शिंदे गटात गेले आहेत. परंतु सर्वांच्या पाठीमागून जाऊन उदय सामंत हे शिवसेनेत फोडाफोडीचे काम करत आहेत. शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक यांना वेगवेगळी आमिषे दाखवून तुम्ही शिंदे गटात या, असे सांगत आहेत, हा प्रकार चुकीचा आहे. त्यांना एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी हितचिंतक, वेळप्रसंगी कामे केली त्या आपल्या अन्य पक्षात असलेल्या नातेवाईकांना शिंदे गटात घ्यावे, असे खा. राऊत यांनी सांगितले. खा. राऊत म्हणाले, शिवसेना पक्षात फोडाफोडी करण्याचा त्यांना अधिकार नाही. कितीही आमिषे दाखवली, काही झाले तरी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक सामंत यांना दाद देणार नाहीत. दीपक केसरकर शिंदे गटात गेले; परंतु त्यांनी शिवसेना संघटनेत गडबड केली नाही. मात्र, उदय सामंत जरा जास्तच ढवळाढवळ करत आहेत.
आता ते पुन्हा शिवसेनेत येऊ शकत नाहीत
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमचा व शिवसेनेचा सात-बारा एकच आहे, त्यामुळे पुन्हा आम्ही एकत्र येऊ असा दावा केला होता. याबाबत खा. विनायक राऊत म्हणाले, याबाबतची भूमिका भाजपचे नेते अमित शहा यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे काही झाले तरी आता ते पुन्हा शिवसेनेत येऊ शकत नाहीत.