कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : तुम्ही खरेदी केलेल्या नव्या गाडीवर तुम्हाला एक मोठं गिफ्ट लागले आहे. तुम्ही या हॉटेलमध्ये येवून तुमचे गिफ्ट घेऊन जा. अशा प्रकारचे फोन करून संबंधितांकडून रातोरात लाखो रूपये घेऊन पळ काढणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. कुडाळ मधील एका हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश केला. अतिशय कमी खर्चात सहा महिने परदेशागमन करण्याचे आमिष दाखवत उच्चवर्गीय लोकांना लुबाडणाऱ्या या रॅकेटने गेल्या तीन महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे एक कोटी रुपये लुटल्याचे समोर आले आहे. कुडाळ मधील यातील दोघांना कुडाळ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

ज्या व्यक्तींनी नवीन चारचाकी गाड्या खरेदी केल्या आहेत अशाच व्यक्तींना हे फोन आले आहेत. कुडाळमधील एका हॉटेलमध्ये गेले तीन दिवस हा प्रकार सुरू होता. येथील हॉटेल मालक राकेश म्हाडदळकर यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांनी कुडाळ मधील काही जाणकार व्यक्तींशी संपर्क साधून याची माहिती दिली. शहरातील काही लोकप्रतिनिधी व काही संघटनांच्या प्रतिनिधींनी या हॉटेलमध्ये जाऊन याबाबत माहिती घेतली. यावेळी हा प्रकार एक प्रकारची फसवणूकच असल्याचे समोर आले असल्याचे त्यांनी सांगितले.

कुडाळ मधील एका हॉटेलमध्ये मागील दोन महिन्यांपूर्वीच एक लाख रुपये भरून घेत सहा वर्षात एक ठराविक दिवस कुठेही फिरा. जेवण, राहणे एकदम मोफत अशी ऑफर देत चाळीस दिवस फिरण्याचे कार्ड मिळेल असे सांगण्यात आले होते. परंतु साठ दिवस झाले तरी कोणतेही कार्ड आले नसल्याने हा फ्राॅड असल्याचे लक्षात आले. एका जोडप्याला ६५ हजार रुपयांत तीन वर्षात २७ दिवस कुठेही फिरा अशी ऑफर दिली होती. अशा अनेक ऑफर देत त्यांनी आजच्या एका दिवसात १ लाख ३५ हजार रुपये जमवले आहेत. यातील बहुतेक रक्कम ऑनलाईन पद्धतीने स्विकारली आहे.

हे बिंग फुटल्याचे लक्षात येताच काही मुली व अन्य कर्मचारी यांनी या हॉटेलमधून काढता पाय घेत पलायन केले. मात्र ज्या दोन व्यक्ती सापडल्या आहेत त्यातील एकाला चांगलाच चोप देत पैसे परत देण्याबाबत कबुल करून घेतले. मात्र या कंपनीच्या वरिष्ठांनी वेगवेगळी कारणे देत पैसे परत करण्याचे टाळले, यानंतर लोकांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधत पोलिसांना बोलवले. पोलीस मंगेश शिंगाडे यांनी घटनास्थळी जाऊन या दोघांनाही त्यांच्या साहित्यासह ताब्यात घेत पोलीस स्थानकात आणले. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी याबाबत कायदेशीर बाबी तपासण्यास सुरवात केली. ही प्रक्रिया उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होती. पैसे भरलेल्या व्यक्तींमध्ये बहुतांशी उच्च शिक्षित व्यक्तींचा समावेश आहे. तपासानंतर हा प्रकार वेगवेगळ्या कंपनींच्या नावाखाली सुरू असल्याचे लक्षात आले. रविवारी लक्झरीज क्लब प्रा.लि.च्या नावाखाली हा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वी कुडाळ मधील एका हॉटेल मध्ये दुसऱ्या कंपनीच्या नावे असे पैसे घेण्यात आले होते. गिफ्टचे आमिष दाखवून होणारा असा तिसरा प्रकार कुडाळ मधील युवासेनेला उधळून लावण्यात यश मिळवले आहे अशी माहिती संदीप म्हाडेश्वर यांनी दिली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here