रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांचा गळा आवळून त्यांना
ठार मारुन नंतर त्यांचा मृतदेह जाळून राख समुद्रात टाकल्याप्रकरणी त्यांच्या पतीसह अन्य दोघांना शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी सकाळी अटक केली. या तिघांनाही न्यायालयाने 19 सप्टेंबर पर्यंत 9 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सुकांत गजानन सावंत (47, रा. सडामिर्‍या चौसोपीवाडी, रत्नागिरी) रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (43,
रा.सडामिर्‍या मधलावठार, रत्नागिरी) आणि प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (33 मुळ रा.विसापूर कारुळ गुहागर सध्या रा. मिर्‍याबंदर, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

स्वप्नाली सावंत (35) यांना दोन मुले असून ब्युटी पार्लर आणि कपड्याचे दुकान आहे. दि. 1 सप्टेंबर रोजी त्या दुकानात
जात असल्याचे सांगून घरातून निघून गेल्या होत्या. परंतु, त्या घरी परतल्या नाहीत म्हणून त्यांचा पती सुकांत याने 2 सप्टेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली होती. या प्रकरणी तपास करताना सुकांत आणि स्वप्नाली सावंत यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासूनचे वाद अजूनही असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच गेल्या वर्षी सुकांतने स्वप्नाली यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. तसेच तो तिला वारंवार ठार मारण्याची
धमकी देत असे. त्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या आदेशाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध पोलिस अधिकारी व अंमलदारांची पथके नेमून अनेक दिशेने तपास केला असता पोलिसांना तक्रारदार पती सुकांतने पत्नी स्वप्नाली हरविल्याची तक्रार दिली असली तरी प्रत्यक्षात या घटनेपेक्षा वेगळी घटना घडली असल्याचा संशय आला.तपास करण्यासाठी गेले तीन दिवस पोलिसांचे पथक मिर्‍या येथे जाऊन श्वान पथकाच्या सहाय्याने तपास करत होते. परंतु पोलिसांना ठोस निष्कर्ष घेण्यासाठी पुरेसा पुरावा आवश्यक होता.

पोलिस पुरावा शोधत असताना दि. 11 सप्टेंबर रोजी स्वप्नाली सावंत यांची आई संगीता कृष्णा शिर्के (64, रा.
तरवळ,जाकादेवी रत्नागिरी) यांनी तक्रार दिली. त्यानुसार दि. 1 सप्टेंबर रोजी त्यांची मुलगी स्वप्नाली सावंत ही त्यांच्या
आईकडे तरवळला येणार होती. परंतु, ती आली नाही, तेव्हा तिच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता तिच्याशी कोणताही संपर्क होत नव्हता. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी
6 वा. स्वप्नालीची आई आणि त्यांच्या अन्य मुली मिर्‍या येथील स्वप्नालीच्या घरी गेल्या असता तिचा पती सुकांत घरी
होता. यावेळी या सर्वांमध्ये मोठा वाद झाला. तेव्हा सुकांत सावंतने मी आणि माझ्या अन्य दोन साथीदारांनी मिळून 1
सप्टेेंबर रोजी स्वप्नालीचा गळा आवळून ठार मारले असून तिला घराच्या आवारातच जाळून त्याची राख समुद्रात टाकून दिल्याचे सांगितले.

पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या आणि अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा
अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे करत आहेत









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here