कुडाळ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालाही बसला. या पावसाने कुडाळ तालुक्यात महामार्गावरील पंधरा दिवसांपूर्वी बुजविलेल्या खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. पणदूर व अन्य ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या निकृष्ट कामाची पोलखोल पावसाने केली आहे. दरम्यान, सोमवारी धो-धो पावसातच ठेकेदाराकडून हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. मात्र खड्ड्यांमध्ये टाकलेले सिमेंट काँक्रिट पावसाने वाहून जात होते. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी निकृष्ट झाल्याचे अनेकदा उघड झाले आहे. या नव्या चारपदरी रस्त्यावर कुडाळ हद्दीत पणदूर, वेताळबांबर्डे, कुडाळ उद्यमनगर आदी ठिकठिकाणी खड्डे पडले असून हे खड्डे अनेकदा ठेकेदाराकडून बुजविण्यात आले. मात्र, बुजविलेले खड्डे पुन्हा चार दिवसांनी उखडत असल्याने ठेकेदार चांगलाच हैराण झाला आहे. आधी डांबर, नंतर पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रिट, पावसाळी डांबराच्या सहाय्याने कुडाळ हद्दीतील खड्डे बुजविण्यात आले. मात्र ही मलमपट्टी काही दिवसांपुरतीच ठरत आहे. गणेशोत्सवापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरण व हायवे ठेकेदाराने धावाधाव करीत महामार्गावरील खड्डे तातडीने बूजविले. मात्र, गेले चार दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या धो धो पावसाने हे खड्डे परत उखडले आहेत. पणदूर, कुडाळ येथे खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामाचा सुमार दर्जा उघड होत आहे.

पावसाने तर या निकृष्ट कामाची चांगलीच पोलखोल केली आहे.सोमवारी वेताळबांबर्डे पुलानजीक पणदूरयेथे उखडलेले खड्डे बुजविण्याचे काम ठेकेदाराकडून हाती घेण्यात आले. मात्र, भर पावसात सुरू असलेल्या या कामामुळे खड्ड्यांत घातलेले सिमेंट काँक्रिट पावसाने वाहून जात होते. तेथे सिमेंट काँक्रिट, पेव्हर ब्लॉक व पावसाळी डांबराने अनेकदा खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र, ही तकलादू मलमपट्टी औटघटकेतच फोल ठरली आहे. वाहनांची रहदारी, अवजड वाहनांची ये-जा आणि मुसळधार पाऊस यामुळे खड्डे दुरूस्तीचे काम फोल ठरत आहे. नव्याने करण्यात आलेल्या चौपदरी रस्त्यावर दोन वर्षातच खड्डे पडत असतील तर हा महामार्ग पुढे किती दिवस टिकणार? असा प्रश्न वाहनधारक व नागरिकांमधून विचारला जात आहे. महामार्ग दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वारंवार उखडत असलेल्या खड्ड्यांतून स्पष्ट दिसत आहे. या महामार्गाने दररोज येजा करणारे लोकप्रतिनिधी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया वाहनधारक व नागरिकांमधून उमटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here