रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : आम्ही आ. आदित्य ठाकरेंसोबत असताना त्यांच्या सभांना पन्नास हजार शिवसैनिकांची गर्दी होत होती. शुक्रवारच्या रत्नागिरीतील सभेत चारशे खुर्च्या होत्या. त्यांना कॉर्नर सभा घ्याव्या लागत आहेत. हा आदित्य ठाकरेच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मात्र, इतरांच्या टीकेला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेऊन आपण उत्तर देणार आहे. तेव्हा कोण किती निष्ठावान आहे. कोणी काय काय केले होते, हे उघडपणे सांगणार असल्याचा इशारा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांचे नाव न घेता दिला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत शनिवारी रत्नागिरी शहराच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प जाण्याला पूर्वीचे उद्योगमंत्रीच जबाबदार आहेत. त्यांनी हाय पॉवर कमिटीची सभा का घेतली नाही. त्यांच्या मिटिंग झाल्या होत्या, तर त्यामध्ये काय चर्चा झाली हे ते का सांगत नाहीत. मागच्या उद्योगमंत्र्यांनीच याचे उत्तर देणे आवश्यक होते. असे सांगताना मागील उद्योगमंत्र्यांच्या काळात काय काय ‘उद्योग’ झालेत यांची चौकशी लावणार असल्याचा इशारा ना. सामंत यांनी दिला आहे. बारसू रिफायनरीला स्थानिक आ. राजन साळवी यांचा पाठिंबा आहे, मात्र खासदार विनायक राऊत विरोध करतात. 350 लाख कोटी रु.ची गुंतवणूक असलेल्या रिफायनरीत किती रोजगार उपलब्ध होतील. रोजगार देणार्‍या कारखान्याला येथे विरोध करायचा तर दुसरीकडे प्रकल्प गुजरातला गेला म्हणून बोंबा मारायच्या.

आता शिवसेनेने बारसू रिफायनरी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. राजापूरच्या एका शिवसेना पदाधिकार्‍यानेच रिफानरीला पाठिंबा असताना खा. राऊत वरिष्ठांना दिशाभूल करणारी माहिती देते असल्याबाबत लेखी तक्रार केली आहे. यावरुन खा. राऊत हे स्थानिकांच्या बाजूने आहेत का हा प्रश्न आहे. शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात माझ्यासह शिंदे गटातील नेत्यांवर टिका झाली. त्यांना मी आता उत्तर देणार नाही. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत जाहीर मेळावा घेऊन यांच्या टिकेला उत्तर दिले जाईल. यावेळी कोण किती निष्ठावान आहे. हे मी जनतेला सांगणार आहे. अनेकांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. वेळ येईल तेव्हा त्या बाहेर काढण्याचा इशारा ना.सामंत यांनी दिला आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here