दापोली; पुढारी वृत्तसेवा : येथील शिवसेना शाखेनजीक उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात राडा झाला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण असून, शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी दापोली येथे झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटले. त्याचा राज्यभरात शिवसैनिकांनी निषेध केला. यावेळी दापोलीतील शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा पुतळा जाळत असताना शिंदे गटातील कार्यकर्ते यावेळी भिडल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी ठाकरे गटाकडून रामदास कदम यांच्याबद्दल जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या राड्यात शिवसेना शाखा कार्यालयाची काचदेखील फुटली आहे. या प्रकारामुळे दापोलीत तणावाच वातावरण होते. या वेळी विभागीय पोलिस अधिकारी रविकिरण काशीद हे घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या वेळी चोख पोलिस बंदोबस होता. ही परिस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे -शिंदे गटाच्या दोन्ही बाजुंच्या प्रतिनिधीना दापोली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण आटोक्यात आले आहे. या आधीही दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गट असा परस्पर एकमेकांच्या तंगड्या तोडण्याचा विषय माध्यमानद्वारे समोर आला होता. तेव्हापासून ही खदखद सुरु होती. या वेळी शिंदे गटाकडून शिवसेना शाखा बंद करण्याबाबत पोलिसांना सांगण्यात आले तर या वेळी शाखा बंद न करता या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी दोन्ही बाजुंच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी दापोली पोलिस ठाण्यात घेऊन गेल्यानंतरही या ठिकाणी धूम:श्चक्री झाली या वेळी पोलिसांनी गर्दी पांगवली. दापोलीत या तणावपूर्ण वातावरणाचे पडसाद राज्यभर उमटलेले पाहावयास मिळाले. या ठिकाणी घटनेचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना देखील पोलिसांनी दम भरून पांगविले. त्यामुळे पत्रकार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पोलिसांचे परिस्थितीवर नियंत्रण विभागीय पोलिस अधिकारी रविकिरण काशिद यांनी तणावपूर्ण परिस्तिथी योग्य पद्धतीने हाताळलेली पहाला मिळाली. त्यांनी दोन्ही बाजुंनी तापलेले वातावरण नियंत्रणात आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here