
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : हातगाड्यांवरून वेगवेगळ्या वस्तू आणि फळांचे व्यवसाय करण्यासाठी परप्रांतीय घुसले आहेत. त्यामुळे रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापारी आर्थिक अडचणीत येऊ लागल्याने अशा रस्त्यावरील व्यावसायिकांवर कारवाई होण्यासाठी आक्रमक झाले आहेत. कारवाईसाठी व्यापारी आंदोलनही करणार असून, जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत कोणतेही कर न भरण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
रत्नागिरी बाजारपेठेतील दुकानांच्या समोर मोसमी वस्तूंचे आणि फळांच्या हातगाड्या लावल्या जातात. त्यामुळे अधिकृत दुकान थाटून व्यापार करणार्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. प्रत्येक दुकानात दोन किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असतात. त्यांचा ग्राहक बाहेर हातगाडीवरील व्यावसायिक आकर्षित करू लागल्याने कामगारांचे पगार भागवणेही कठीण झाले आहे. जे काही स्थानिक कटलरी व्यावसायिक पादचार्यांना आणि वाहतुकीला अडथळा न करता बसतात त्यांच्याप्रती काहीसी सहानुभूती दाखवली जात आहे. मात्र, टेबल, खुर्च्यांपासून शेगड्या, रक्षाबंधनच्या काळात राख्या असे व्यापार्यांच्या दुकानांसमोर बसणार्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
हातगाडीवरून फळे विकणारे तर फोफावले आहेत. रत्नागिरीच्या बाजारपेठेत अरुंद रस्ते असून, त्याच रस्त्यांवर दुकानांच्या दारात गाड्या लावल्या जातात.
अवाच्यासव्वा दराने फळे विकली जातात. त्याचबरोबर ग्राहकांबरोबर अरेरावीही केली जाते. नगर परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील जागा अडवून ती भाड्यानेही इतर हातगाडीवाल्यांना देण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे जे व्यापारी मालमत्ता कर, लाईट बिल, पाणी बिल असे अनेक कर भरून व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता या स्थानिक व्यापार्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आंदोलनाबरोबरच जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत कर न भरण्याचाही विचार केला जात आहे. रत्नागिरीतील अनेक स्थानिक महिला कटलरी व्यवसाय करतात. त्यांचे व्यवसाय अडथळा होणार नाही अशा पद्धतीने असल्याने त्यांच्याप्रती मात्र सहानुभूती आहे.
- कारवाई होण्यासाठी व्यापारी आक्रमक
- बाजारपेठेत दुकांनासमोरच हातगाड्या उभ्या
- आर्थिक टंचाईमुळे कर्मचार्यांना पगार देणे कठीण
- अरुंद रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा
- हातगाडी चालकांकडून ग्राहकांबरोबर अरेरावीचेही प्रकार