पुढारी ऑनलाईन वृत्तसेवा : मुंबई गोवा महामार्गवर गॅस गळती दुर्घटनेनंतर बंद करण्यात आलेली वाहतूक 21 तासानंतरही ठप्प आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील पुलावरून भारत पेट्रोलियमचा गॅस टँकर नदीत कोसळला. त्यामुळे टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. घटनेमुळे महामार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. अद्यापही या मार्गावरील ( Mumbai-Goa highway ) वाहतूक ठप्प आहे.

सविस्तर माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरील अंजनारी (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील पुलावरून भारत पेट्रोलियचा गॅस भरलेला टँकर नदीत कोसळला. या दुर्घटनेत चालकाचा जागीच पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. टँकर क्रमांक एमएच १२- एल टी- ६४८८ घरगुती गॅस घेऊन जयगडहून गोव्याच्या दिशेने चालला होता. अंजनारी येथील उतार उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने टँकर नदीत कोसळला. त्यात चालक प्रमोद जाधव (रा. उस्मानाबाद) यांचा बुडून मृत्यू झाला. अपघात गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडला. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेने मृत चालकाला लांजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले.  गॅस गळतीमुळे  महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

अपघाताची भीषणता मोठी आहे. टँकरचे तीन तुकडे तीन ठिकाणी पडले होते. टँकरचे टॅंक व इंजिन बॉडी असे दोन भाग झाले आहेत. पुलाचा कठडा तोडून तो खाली कोसळला आहे. तर पुलावरही काही भाग अडकला आहे.

हेही वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here