खारेपाटण; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र् राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या खारेपाटण येथील सबस्टेशमधील एका ट्रान्सफॉर्मरने अचानक पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. आगीसह मोठेच्या मोठे धुराचे लोट आकाशात जाताना दिसत होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी 4.35 वा. च्या सुमारास ही आग लागली.कणकवली व राजापूर नगरपंचायतीच्ंया बंबांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू होते.

खारेपाटण येथील विद्युत सबस्टेशनमधील स्टेप डाऊन करणार्‍या ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रान्स्फार्मरमधील ऑईलने पेट घेतला. परिणामी आगीचा एकदम भडका उडाला. आग एवढी प्रचंड होती की आगीचे धुराचे लोट आकाशात उंच जाताना दिसत होते. 220 के व्ही सबस्टेशन मध्ये लागलेल्या या आगीचे माहिती कणकवली नगरपंचायत देताच तेथील अग्निशमन दलाची गाडी खारेपाटण येथे 5.30 वा. दाखल झाली.त्यानंतर आग विझवण्यास सुरुवात करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, उपनिरीक्षक शिवराम शेडगे, कॉन्स्टेबल किरण मेथे, मंगेश बावदाने, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच इस्माईल मुकादम,ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, तलाठी के. सिंगनाथ खारेपाटण पोलीस स्टेशनचे उद्धव साबळे, पराग मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली.

महावितरणचे खारेपाटण येथील सहा.अभियंता किशोर मर्ढेकर यांनी तातडीने संबंधित प्रशासनाला माहिती देत या सब स्टेशन मधून कणकवली व तळेबाजार येथे करण्यात येणारा विद्युत पुरवठा बंद केला. दरम्यान, परिसरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
आग आटोक्यात न आल्यामुळे राजापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी बोलावण्यात आली. सायंकाळी 6 वा. ही गाडी खारेपाटणमध्ये दाखल झाली. सायंकाळी उशीरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न चालू होते.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here