दापोली; पुढारी वृत्तसेवा :  दापोली नगरपंचायतीत प्रथम दर्शनी तीन ते चार कोटींचा अपहार झाला असल्याचे दिसून येत असले, तरी हा अपहार पन्नास कोटींपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी माहिती दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष ममता मोरे, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे, रवींद्र क्षीरसागर, ऋषीकेश गुजर यांनी दि. 22 रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. हा अपहार नगर पंचायतीमधील लेखापालने केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी नगरसेविका साधना बोत्रे, रिया सावंत, विलास शिगवण, अश्विनी लांजेकर, नगरसेवक आरिफ मेमन, मेहबूब तळघरकर, अन्वर रखांगे, संतोष कळकुटके उपस्थित होते. हे प्रकरण मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. ढेकळे यांच्या कार्यकाळात जवळपास दीड कोटींच्या झालेल्या अपहाराची रक्कम ही सावंत यांनी दापोली नगरपंचायत खात्यात वर्ग केली असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. दापोली नगरपंचायत स्थापनेपासून येथे ते लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात पन्नास कोटींचा अपहार झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

अपहाराची रक्कम ही दोघांना अदा करण्यात येत होती. दापोली नगर पंचायतीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी अशी आघाडीची सत्ता आल्यानंतर लेखापालाला लेखा पदावरून हटवून त्यांच्या जागी दुसर्‍याची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी कॅशबुकमध्ये अपहार झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत दापोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. संबंधित लेखापालाला पुढील आदेश होईपर्यंत सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. कार्यालयीन चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here