
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : लांजा परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती करणार्या आरोपीला न्यायालयाने २० वर्ष सक्तमजुरी आणि २४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अक्षय शिवाजी गवड (२३, रा.लांजा, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने लांजा येथील अल्पवयीन मुलीशी मे २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत शारीरीक संबंध ठेवले होते.
काही दिवसांनी पीडितेला त्रास जाणवू लागल्याने तिच्या आईने तिला लांजा येथील खासगी डॉक्टरकडे नेले होते. परंतु तिचा त्रास वाढल्याने तिच्या आईने तिला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेत त्याठिकाणी तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्यात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. दरम्यान, पीडितेच्या आईने याबाबत आरोपी अक्षय गवड विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
परंतु हा गुन्हा लांजा येथे घडल्याने हा गुन्हा लांजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी लांजा पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला न्यायालयात सुरु होता. शुक्रवारी या खटल्याचा निकाल देताना पोक्सो विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी १८ साक्षीदार तपासून केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात लांजा पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक अनिल गंभिर आणि पोलीस निरीक्षक श्वेता पाटील यांनी तपास केला. तसेच पैरवी अधिकारी म्हणून कदम यांनी काम पाहिले.
हेही वाचलंत का?