
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : कर्मचार्यांना वेतनासाठी एसटी महामंडळाला शंभर कोटींचा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. वित्त विभागाने या संदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. यामुळे ऐन सणासुदीत पगार झाले नाहीत तर आर्थिक संकट ओढवेल, अशी भीत असलेल्या कर्मचार्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, राज्य सरकारी कर्मचार्यांप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळावेत, महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे आदी मागण्यांसाठी कर्मचार्यांनी ‘मविआ’ सरकारच्या काळात जवळपास सहा महिने संप केला होता. त्यावेळी सरकारने काही प्रमाणात वेतनवाढ करत कर्मचार्यांच्या वेतनासाठी निधी देण्याची जबाबदारी घेतली होती. अर्थसंकल्पातही त्या अनुषंगाने तरतूद करण्यात आली होती. अलीकडच्या काळात पुन्हा एकदा कर्मचार्यांच्या वेतनावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.