चिपळूण : पुढारी वृत्तसेवा : येथील चिपळूण अर्बन बँकेच्या 89 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षा राधिका पाथरे यांनी, एका कर्मचार्‍याने बँकेमध्ये लाखोंचा अपहार केल्याचे उघड केले. बँकेला ऑनलाईन गंडा घातल्याचे यामुळे सभेत उघड होताच काही सदस्यांनी भुवया उंचावल्या. मात्र, संबंधितावर लवकरच फौजदारी गुन्हा दाखल होईल या बाबत अंतर्गत लेखा परीक्षण सुरू असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

शहरातील राधाताई लाड सभागृहात बँकेची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष निहार गुढेकर, माजी अध्यक्ष संजय रेडीज, संचालक अनिल दाभोळकर, सतीश खेडेकर, मंगेश तांबे, मोहन मिरगल, डॉ. दीपक विखारे, डॉ. धनंजय खातू, समीर जानवलकर, अ‍ॅड. दिलीप दळी, श्रीराम खरे आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षा सौ. पाथरे यांनी बँकेचा लेखा-जोखा मांडतानाच एका आय.टी. ऑफिसरने बँकेमध्ये अपहार केला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात येणार आहे. पोलिसांनी अंतर्गत लेखा परीक्षण करून अहवाल द्यावा. यानंतर कारवाई करू, असे सांगितले आहे. त्यानुसार लवकरच संबंधितावर पोलिस कारवाई होणार आहे. या प्रकरणी अपहार केलेल्या व्यक्तीकडून काही रक्कम जमा देखील करण्यात आली आहे. त्याने या प्रकरणी कबुली देखील दिली आहे. सध्या अधिक चौकशी सुरू असून सभासदांच्या ठेवीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. बँक हे प्रकरण यशस्वीपणे हाताळत आहे.

लोकांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून आपण सभेतच याची कल्पना सभासदांना देत आहोत. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी बँकेचा एकूण नफा पाच कोटी आहे. मात्र, गेल्या तीन वर्षात कोरोना, चिपळुणात आलेला महापूर या पार्श्वभूमीवर बँकेचे ठेवीदार, कर्जदार घटले आहेत. या शिवाय बँकेने ठेवीदारांना सहा टक्के व्याजाचा दर ठेवला आहे. यामुळे अनेक ठेवीदार अन्यत्र वळत आहेत. याचा परिणाम झाला असल्याचे या सभेत सांगण्यात आले. यावेळी काही सदस्यांनी, संचालक मंडळाने ठेवीवर व्याजदर वाढवावा. अन्यत्र एक ते दोन टक्के ज्यादा दर असल्याने लोक अन्यत्र ठेवी ठेवत आहेतत. याचा परिणाम बँकेच्या प्रगतीवर होत असल्याचे संचालकांच्या निदर्शनास आणले. संस्थेच्या चार शाखा फायद्यात येत आहेत. उर्वरित शाखा फायद्यात येण्यासाठी प्रयत्न होत असून बँकेने अंतर्गत लेखा परीक्षण सुरू केले आहे असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई यांनी सांगितले. यावर्षी सभासदांना सहा टक्के लाभांश देण्यात येत आहे. याची घोषणा अध्यक्षा पाथरे यांनी केली. गेली काही वर्षे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशामुळे लाभांश देता येत नव्हता. मात्र, कर्ज वसुली वाढल्याने यावर्षी लाभांश देण्यात येत असल्याचे जाहीर केले व तत्काळ सभासदांच्या खात्यात सहा टक्के लाभांश जमा होईल असे सांगितले. यावेळी अनेक मान्यवर, सदस्य उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सूचय रेडीज यांच्यासह अनेकांनी सभेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here