चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  चिपळूणच्या भर बाजारपेठेत गुटख्याच्या साठ्यांवर अन्न भेसळ प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी छापे टाकले. शहरातील दोन ठिकाणी मारलेल्या या छाप्यात लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला असून अधिकार्‍यांची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

चिपळुणात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असताना अनेक ठिकाणी गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात देखील चिपळूणमधून गुटख्याचा पुरवठा केला जातो, अशी माहिती पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर अन्न भेसळ प्रशासनाचे अधिकारी चिपळुणात गुरूवारी (दि.29) सकाळी दाखल झाले. विशेषकरून मुंबई आणि रत्नागिरी येथील अधिकार्‍यांनी धडकपणे ही कारवाई केली.

शहरातील खेराडे कॉम्प्लेक्सजवळील नुरानी कॉम्प्लेक्समधील एका गाळ्यामध्ये सचिन खेराडे तर रंगोबा साबळे मार्गावरील एका फ्लॅटमध्ये गुटखा आढळून आला. दोन पथकांमार्फत ही कारवाई करण्यात आली. मुंबई व रत्नागिरी येथील अधिकार्‍यांच्या दोन पथकांनी ही कारवाई सुरू केली असून सुमारे तीन ते पाच लाखांचा गुटखा या कारवाई जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी देखील दखल घेतली असून घटनास्थळी पोलिसांनी देखील भेट दिली.

या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत साठा करून ठेवलेला गुटखा जप्त करून कारवाई सुरू होती. या नंतर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विमल, आरएमडी, केसर अशा अनेक प्रकारचा गुटखा या कारवाईत जप्त करण्यात आला असून एक कार देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here