रत्नागिरी;  पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे अधिकृतपणाचे पुरावे सादर केले आहेत. अजूनही पक्षाच्या चिन्हाबाबत पुरावे सादर केले जातील. पक्षाच्या घटनेप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव यांचाच शिवसेनेवर अधिकार असून फुटीर लोकांचा तो होऊ शकत नाही, शिवसेनेशी समांतर संघटना उभी केली तरी तो होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेकडून खरे-खोटेपणा ठेवला जाईल. न्याय आम्हाला नक्की मिळेल, असा दावा शिवसेना खासदार व सचिव विनायक राऊत यांनी केला.

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत गुरुवारी रत्नागिरी दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रामदास कदम यांची बडबड आम्ही गांभीर्याने घेत नाही, शिवसेनेत गद्दारीची कीड कुणी रुजवली असेल तर ते रामदास कदम यांनी. नारायण राणे शिवसेना सोडताना राणेंच्या बंगल्यावर रामदास कदम राहिले होते, त्यावेळी शिवसेनेकडून फुटून राणे गटात या हे सांगणारे रामदास कदम आघाडीवर होते. खुपते तिथे गुपते या कार्यक्रमात नारायण राणेंनी याचा गौप्यस्फोट केला होता. राणे यांनी या कार्यक्रमात रामदास कदम यांच्या निष्ठेचे वस्त्रहरण केले होते. त्यामुळे त्यांना अत्ता अक्कलदाड सुटली असेल आणि शिवसेनेला शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न करत असतील तर तो करू नये, असा थेट इशारा विनायक राऊत यांनी रामदास कदम यांना दिलाय.

शिवतीर्थावर आमचीच संख्या जास्त असेल

दसर्‍या मेळाव्याला उत्फूर्तपणे येणार्‍याची संख्या मोठी आहे. त्याची तुलना इतर कोण करत असेल तर त्यांचा भ्रमनिरास होईल, असा टोला शिवसेना खा. विनायक राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे. शिवतीर्थावर जनसमुदाय असेल, आम्ही लाखांचे आकडे सांगत नाही. येणारा जनसुमुदाय शिवतीर्थावर दिसेल. शिवतीर्थावर आमची संख्या जास्तच असेल. शिंदे हा गट आहे तर शिवसेना हा पक्ष असल्याचे खा. विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here