
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्यामुळे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींपाठोपाठ ग्रामपंचायतींवरही प्रशासकीय राजवट राहणार असल्याने गावाचा कारभार हा अधिकार्यांच्या हाती जाणार आहे.
ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आवश्यक ते नियोजन निवडणूक आयोगाकडून केले जात आहे. ते पूर्ण होण्यापूर्वीच ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे ग्रा.पं.चा पाच वर्षांचा कालावधी जसा पूर्ण होत जाईल तसे तिथे प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. ग्रामविकास विभागाला राज्य निवडणूक आयोगाने लिहिलेल्या पत्रात कोव्हिडबाबत शासनाने लागू केलेले निर्बंध तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध रिट याचिकांमुळे जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका टप्प्याटप्याने घेण्यात येत आहेत. पुढील तीन महिन्यांत जिल्ह्यातील 222 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करावी लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार अधिकार्यांच्या हातात जाणार आहे. अनेकवेळा ज्यांच्याकडे प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाते, त्यांना आपले नियमित कामकाज करुन ग्रामपंचायतीकडे लक्ष द्यावे लागत असते. परिणामी गावाच्या विकासकामांचा ओघ कमी होत जातो. पुढील तीन महिन्यात जिल्ह्यातील एकुण ग्रामपंचातींच्या एक तृतीयांश ग्रामपंचायतींवर प्रशासक बसवला जाणार असल्याने तेथील कामांना ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे.