रत्नागिरी : भालचंद्र नाचणकर : रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 14 झोन येत्या दोन-तीन दिवसांत कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराला आता शीळ धरणातूनच पाणी पुरवठा होणार आहे. सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) प्रतिदिन 3 दशलक्ष लिटर पाणी घेतले जात आहे, ते आता बंद होणार आहे. यामुळे रत्नागिरी नगर परिषदेची लाखो रुपयांची बचत होणार आहे.

रत्नागिरी शहराच्या नवीन नळपाणी योजनेतील 14 झोनपैकी एका झोनमधील अंतर्गत जलवाहिनी टाकणे, या जलवाहिनीवरून नळ जोडण्या देणे, टेस्टींग करणे ही कामे लांबली होती. रविवारी जलवाहिनी अंथरून त्यावरून जोडण्या देण्याचे काम पूर्ण झाले आहे. यापुढे पाणी पुरवठ्याचे टेस्टिंग होणे बाकी आहे. हे टेस्टिंग झाल्यानंतर संपूर्ण शहराला शीळ धरणातील पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.

रत्नागिरी शहरातील काही भागांमध्ये औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणी पुरवठा केला जात होता. प्रतिदिन 3 दशलक्ष लिटर पाणी महामंडळाकडून घेतले जात होते. याचे दरमहा 8 लाख रुपये बिल भरावे लागत होते. त्याची आता बचत होणार आहे. रत्नागिरी शहराला शीळ, पानवल धरणातून पाणी पुरवठा होतो. त्याचबरोबर काही भागांमध्ये औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळणारे पाणी पुरवले जात होते. सध्या शीळ धरणातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे औद्योगिक महामंडळाकडून अधिकचे पाणी घ्यावे लागत होते. नवीन नळपाणी योजनेंतर्गत संपूर्ण शहरात जलवाहिन्या टाकून त्यातून जोडण्या देण्यात आल्या आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याचे 14 झोन असून या सर्व झोनमधील पाणी पुरवठ्यासंदर्भातील कामे पूर्ण झाली आहेत. टेस्टिंगनंतर दोन-तीन दिवसांतच रत्नागिरी शहरात शीळ धरणातून पाणी पुरवले जाणार आहे.

पाणी पुरवठ्याची वेळ बदलली…

रत्नागिरी शहराचे पाणी पुरवठ्याचे 14 झोन आहेत. यातील एका झोनमध्ये पहाटे 4.00 वा. पासून पाणी पुरवठा सुरू होतो. परंतु येथील नागरिकांना या वेळेमुळे झोप मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे या झोनमधील पाणी पुरवठ्याची वेळ पहाटे 4.45 वा. ची करण्यात आली आहे. परिणामी पुढील पाणी पुरवठ्याची वेळ वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here