कणकवली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले सिंधुदुर्गातील शिवसेनेचे आ. वैभव नाईक यांची शुक्रवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी कणकवलीतील शासकीय विश्रामगृहावर सुमारे पाऊण तास प्राथमिक चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांचे उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबत आवश्यक त्या माहितीचे फॉर्म भरुन त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी 12 ऑक्टोबरला सकाळी 11 वा. पोलिस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात उपस्थित राहण्याचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, आ. वैभव नाईक यांची ‘एसीबी’मार्फत चौकशी केली जात असल्याने जिल्हा शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान चौकशीच्या वृत्त शिवसैनिकांपर्यंत पोहोचताच जिल्ह्यातील शिवसैनिकांनी शनिवारी त्यांच्या कणकवली येथील निवासस्थानी येऊन पाठिंबा दर्शविला. एसीबीचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांनी शुक्रवारी सायंकाळी आ. वैभव नाईक यांना त्यांच्या मालमत्तेच्या प्राथमिक चौकशीकामी शुक्रवारी सायंकाळी उशिरा कणकवलीतील शासकीय विश्रामगृहावर फोन करुन बोलवले. आ. वैभव नाईक हे कणकवलीतच होते. त्यानुसार ते विश्रामगृहावर चौकशीसाठी दाखल झाले. सुमारे अर्धा ते पाऊण तास एसीबीच्या अधिकार्‍यांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली. रात्री साडेआठच्या सुमारास चौकशी आटोपून पथक निघून गेले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. वैभव नाईक म्हणाले, कोणीतरी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने आपल्याला प्राथमिक चौकशीसाठी फोन करून बोलावले. अधिकार्‍यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण उत्तर दिली. त्यांनी माझ्याकडे जी माहिती मागितली आहे. तीही आपण त्यांना देणार आहे. आपण अनेक वर्षांपासून राजकारणात, समाजकारणात आहे. तसेच अनेक व्यवसायातही आपण आहे. आपल्या संपत्तीचे विवरणपत्र वेळोवेळी दिलेले आहे. यापूर्वी अशी चौकशी कधीच झालेली नव्हती; मात्र आपण चौकशीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

12 ऑक्टोबरला नोंदवला जाणारा जबाब एसीबीमार्फत आ. वैभव नाईक यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपल्या मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरू करण्यात आली आहे. या उघड चौकशीच्या अनुषंगाने 1 जानेवारी 2002 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीतील आपले उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबत सोबत जोडण्यात आलेले मत्ता व दायीत्वाचे 1 ते 6 फॉर्म नमूद मुद्याच्या अनुषंगाने त्वरीत भरुन द्यायचे आहेत. या फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपला जबाब नोंद करायचा आहे. त्यासाठी 12 ऑक्टोबरला सकाळी 11 वा. सदर फॉर्म भरुन जबाब नोंदविण्यासाठी एसीबीच्या रत्नागिरी कार्यालयात हजर रहावे, असे या नोटिसीत म्हटले आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here