लांजा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील माचाळ येथे रविवारी (दि.९) गवारेड्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भिकाजी राघव मांडवकर (रा. माचाळ, वय ६५) हे आपल्या शेतात दुपारच्या सुमारास काम करीत होते. त्यावेळी अचानक गवारेडा त्यांच्यासमोर आला. गवारेडा समोर येताच ते घाबरले. त्यांनी तेथून बाजूला होण्याचा प्रयत्न केला. मात्र, गवा रेड्याने सरळ त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गव्याने त्याची शिंगे मांडवकर यांच्या पोटात घुसवले. यावेळी आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी ही घटना पाहिली व यावेळी त्यांनी गव्याला तेथून हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत गवारेड्याने भिकाजी मांडवकर यांना गंभीर जखमी केले होते. या नंतर गवारेडा जंगलात पसार झाला.

घटनेविषयी माहिती मिळताच लांजा वनविभाग तसेच स्थानिक लोकांनी रुग्णवाहिका बोलावली. त्यांना तात्काळ उपचाराकरिता शिपोशी येथे आणण्यात आले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लांजा तालुक्यातील पूर्व भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचंलत का?









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here