गुहागर; पुढारी वृत्तसेवा : पोलिस असल्याचे भासवून एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा उमेश शिगवण (26, रा. निगुंडळ) याचा डाव फसला. यातील मुलीने हुशारी दाखवत त्याचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला शोधून अटक केली आहे.

गुहागरच्या समुद्रकिनार्‍यावर एक अल्पवयीन मुलगी मंगळवारी (दि. 4) दुपारी मित्रासोबत फिरायला आली होती. यावेळी उमेश शिगवणने तिला हेरले. पोलिस असल्याची बतावणी केली. ‘तू माझ्यासोबत पोलिस ठाण्यात चल’ असे सांगत उमेश तिला पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या समुद्रकिनार्‍यावर घेऊन आला. तिथे आल्यावर गुहागरचे पोलिस कडक आहेत, ते तुला तुरुंगात टाकतील. त्यापेक्षा आपण शृंगारतळीच्या पोलिस ठाण्यात जाऊया, तिथले पोलिस चौकशी करून तुला घरी सोडतील, असे उमेशने मुलीला सांगितले आणि तिला रिक्षात बसवून शृंगारतळीकडे रवाना झाला.

पाटपन्हाळे कॉलेजजवळ आल्यावर उमेशने रिक्षा सोडून दिली. मुलीला सांगितले की, आता माझी ड्युटी संपत आहे. पुढची ड्युटी करणारा पोलिस इथे रहातो. त्याच्याकडे आपण जावू. त्यानंतर तुला आम्ही सोडून देवू. असे सांगून पाटपन्हाळे कॉलेज परिसरातील निर्जन जंगल भागात उमेश तिला घेऊन गेला. तिथे गेल्यावर तुला सोडण्यासाठी तु मला काय देशील, असे विचारात उमेशने मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. आपल्याबाबतीत काहीतरी चुकीचे घडत आहे हे लक्षात आल्यावर मुलीने तिथून पळ काढला आणि ती गुहागर शृंगारतळी या रहदारीच्या रस्त्यावर आली. या नंतर उमेशने तेथून पळ काढला.ही मुलगी घरी उशिरा पोहोचली म्हणून पालकांनी चौकशी केली. त्यावेळी आपल्याला एक पोलिसाने पकडले व तो पोलिस ठाण्यात घेवून जात होता, असे मुलींने सांगितले तसेच उमेशचा मोबाईल क्रमांकही दिला. मग पालकांनी गुहागर पोलिस ठाण्यात दूरध्वनीद्वारे माहिती घेतली.

या नंतर ही बाब प्रभारी पोलिस निरीक्षक तुषार पाचपुतेंना समजल्यावर त्यांनी अधिकची चौकशी सुरु केली. मुलीच्या पालकांना विश्वासात घेऊन संपूर्ण हकिगत विचारुन घेतली. गंभीर बाब समोर आल्यावर पुन्हा पालकांना तक्रार करण्याची विनंती केली. पालकांनी तक्रार केल्यानंतर चार पोलिसांचे पथक उमेश शिगवणच्या मागावर गेले. दसर्‍याच्या दिवशी (दि. 5) दिवसभर उमेश घरी गेलाच नव्हता. शोध सुरु असताना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी पोलिसांनी त्याला एका मंदिरात पकडले. पोलिसी हिसका दाखवताच उमेश शिगवणने कबुली दिली. उमेश शिगवण याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here