
म्हसळा; पुढारी वृत्तसेवा : माणगाव- म्हसळा रस्त्यावरील घोणसे घाटातील केळेचीवाडी येथील तीव्र उतारावर सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी होत आहे. तरी हा अपघाती मार्ग दुरुस्त करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली. यावर खासदार तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कायमस्वरुपी अपघात रोखण्यासाठी येत्या आठ दिवसांत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
यावेळी खासदार तटकरे म्हणाले की, पर्यायी मार्ग म्हणून घोणसे घाट सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आला आहे. या घाटात ७ ते ८ वर्षात एकही अपघात झालेला नाही. नव्याने केलेल्या रस्त्याचा दर्जा चांगला आहे. मात्र, एकाच ठिकाणी अवघड वळणावर अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे. येथे अपघातांची संख्या वाढली असल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस महादेव पाटील, तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी जि.प.सदस्य बबन मनवे, घोणसे सरपंच रेश्मा काणसे, एमएसआरडीसी अधिकारी गावित, श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, म्हसळाचे नायब तहसीलदार गणेश तेलंगे, उपनगराध्यक्ष सुनिल शेडगे, गट नेते संजय कर्णिक, राजू लाड, खरसई सरपंच निलेश मांदाडकर, तुकाराम मांदाडकर, अंकुश खडस आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?