Weather Forecast : महाराष्ट्रातील बहुतांश भागाला काल शुक्रवारी पावसाने झोडपले आहे. कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी झाली आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सून माघारी परतला आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. मान्सून माघारची रेषा रक्सौल, डाल्टनगंज, पेंद्र रोड, छिंदवाडा, जळगाव, डहाणू भागांवरुन गेल्याचे दिसत आहे. पुढील २-३ दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मध्य भारतातील उर्वरित भागांमधून मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती होण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य आणि लगतच्या नैऋत्य बाजूस बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे परिवलन आहे. तसेच कर्नाटक किनार्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ परिवलन आहे. या प्रभावामुळे काल शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील ५ दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यामुळे मुंबईतून मान्सून माघारीला आणखी काही दिवस उशीर होण्याची शक्यता आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, कोकण आणि गोव्याच्या किनार्याजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किमीवर चक्रीवादळाचे परिवलन आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील २४ तासांत पावसाची शक्यता आहे.
कोल्हापुरात अतिवृष्टी
सलग दोन दिवसांनंतर एक दिवसाची विश्रांती घेत पावसाने शुक्रवारी कोल्हापूर शहराला पुन्हा झोडपून काढले. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह शुक्रवारी दुपारी सुरू झालेल्या पावसाची सुमारे पाच तासांहून अधिक काळ धुवाँधार वृष्टी सुरू होती. हातकणंगले परिसरात मुसळधार पाऊस झाला. पावसाने अनेक भागात पाणी साचले. जनजीवन विस्कळीत झाले. शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे हातातोंडाशी आलेली हजारो हेक्टरमधील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर पाल घाटात सायंकाळी दरड कोसळली. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी, भुदरगडसह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली.
खरीपातील सुमारे २७ लाख हेक्टरवरील पिके बाधित
जाता जाता परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात धूमाकूळ घातला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. कापूस, सोयाबीन, भातपिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हातात आलेली पिके उद्ध्वस्त झाली असून, खरिपाचा बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. पुढील काही दिवस परतीचा पाऊस उच्छाद मांडणार असल्याने शेतकर्यांची चिंता आणखी वाढली आहे.
राज्यात सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सुमारे 27 लाख हेक्टरवरील पिके बाधित झालेली आहेत. त्यात सोयाबीन आणि बाजरी पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. काही भागात भाताच्या पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सोयाबीनच्या पेरणीने आजवरचे उच्चांक मोडीत काढत 48 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा तयार होण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी काढणीही सुरू झाली आहे. सततच्या पावसामुळे शेंगातून कोंब फुटण्याची स्थिती काही भागात आहे. (Weather Forecast)
14 Oct:उत्तराखंड,उत्तर प्रदेश,गुजरातमधील उर्वरित भागांतून व मध्य प्रदेशातील बहुतांश भाग,बिहार,झारखंड,छत्तीसगड व महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनची माघार.
माघारची रेषा रक्सौल,डाल्टनगंज,पेंद्र रोड,छिंदवाडा,जळगाव, डहाणू ..
3 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून माघारची शक्यता https://t.co/3JrgoPKmyy— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 14, 2022
⇒ Monsoon has further withdrawn from remaining parts of UK, UP & Guj.; most parts of MP and some parts of Bihar, Jharkhand, Chhattisgarh & Maha. Withdrawal line of Monsoon now passes through Raxaul, Daltonganj, Pendra Road, Chhindwara, Jalgaon, Dahanu, Long. 71.0⁰E/Lat.19.5⁰N. pic.twitter.com/qx4C5M0Lt0
— India Meteorological Department (@Indiametdept) October 14, 2022
हे ही वाचा :