कणकवली ः पुढारी वृत्तसेवा :  कणकवली शहरातील एका दुकानातून काही तरुणांनी घेतलेल्या वस्तूंच्या बदल्यात दिलेल्या बिलाच्या रक्कमेत तफावत असल्याची शक्यता लक्षात येताच थेट पोलिसांना बोलावून घेत हातचलाखी उघड करण्यात आली. सेल्फ सर्व्हिस नुसार वस्तू घेतल्यानंतर बिलिंगच्या वेळी काऊंटरवर गेल्यावर हात चलाखी करत बिलिंगवेळी ठराविकच वस्तू काउंटरला दाखविण्यात आल्या. मात्र, यापूर्वी यातील काहीजण हे रडारवर असल्याने त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलेला होता व इथेच ते दोघेजण फसले. कणकवलीत रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.

उपलब्ध माहितीनुसार, कणकवलीतील एका दुकानात खरेदी करिता दुपारच्या सत्रात गेलेले ते दोघे दुकानाच्या एका ठराविक भागात रेंगाळले व तेथील काही वस्तू घेतल्या व त्या पिशवीतदेखील घातल्या. मात्र, बिलिंगवेळी त्या वस्तू काऊंटरला दाखवण्यात आल्या नाहीत. ही बाब कर्मचार्‍यांनी लगेचच सीसीटीव्हीत बिलिंग करत असतानाच चेक केली. त्यावेळी ही हातचलाखी उघड झाली. मात्र, त्या दोघांशी चर्चा न करता हा प्रकार तातडीने कणकवली पोलिसांना कळविण्यात आला. पोलिसांनी तातडीने धाव घेत त्या तरुणांना थांबवून झाडाझडती घेतली.

यावेळी ऑनलाईन बिलिंग केलेली रक्कम व प्रत्यक्षात या दोघांनी त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत भरलेला माल यात फरक येत जवळपास 2000 च्या आसपास रक्कमेचा माल या दोन तरुणांनी घेतला होता. पण, प्रत्यक्षात सुमारे 900 रुपयांचे बिलिंग केले होते. ही बाब उघड झाली. मात्र, अखेर प्रकरण अंगाशी येत आहे हे लक्षात येताच फरकाची रक्कम देत या विषयावर पडदा टाकण्यात आला. सदरचे तरुण हे परजिल्ह्यातील असून शिक्षणासाठी सिंधुदुर्गात आल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here