साडवली : पुढारी वृत्तसेवा : आपण पोलिस इन्स्पेक्टर आहोत, असे सांगून वृद्ध महिलेकडील दोन सोन्याच्या पाटल्या व दोन सोन्याच्या बांगड्या असा एकूण 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना साडवली सह्याद्रीनगर येथे शनिवारी घडली आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

देवरूख पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धीरज देसाई यांनी देवरूख पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. धीरज देसाई यांची आई कल्पना अनंत देसाई या शनिवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास देवरूखसंगमश्वेर या मुख्य रस्त्यावरून ये-जा करत होत्या. याचवेळी एका व्यक्तीने त्यांना आपण पोलिस इन्स्पेक्टर आहोत असे सांगितले.

आताच चोरी झाली असून, तुम्ही सोन्याचे दागिने अंगावर घालून फिरू नका, असे सांगितले. हातातल्या बांगड्या व पाटल्या काढून कागदात ठेवण्यास सांगितले. याचवेळी या व्यक्तीने हातचलाखी करत सोन्याच्या बांगड्या आपल्या ताब्यात घेत नकली बांगड्या कल्पना देसाई यांच्याकडे सुपूर्द केल्या. गळ्यातील सोन्याची चेनदेखील तो मागत होता. मात्र त्यांनी ती काढली नाही. कल्पना देसाई या घरी गेल्यानंतर कागदामध्ये नकली बांगड्या असल्याचे दिसून आले.

प्रकार सीसीटीव्हीत कैद हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या इसमाला दुचाकीवरील दोन जणांनी सहकार्य केल्याचे दिसून येत आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा चोरीची घटना घडल्याने
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here