
सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : कारिवडे-गावठणवाठी येथे निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार पाहायला मिळाला आहे. तेथील शेतकरी शांताराम कारिवडेकर यांच्या बागायतीत उगवलेल्या केळीला एक-दोन नव्हे तर तब्बल आठ बोंडे आली आहेत. दारात अशा प्रकारचा अनोखा घडलेला प्रकार पाहून कारिवडेकर कुटुंब सुखावले आहे. हा प्रकार अपवादात्मक असल्याचे सावंतवाडी पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी सांगितले.
कारिवडेकर हे सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातून नायक पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी घराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती बागायती केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरासमोर असलेल्या केळीला एक-दोन नव्हे तर तब्बल आठ बोंडे आलेली त्यांच्या पत्नीने पाहिली. त्यांनी ही माहिती आपल्या घरातील व्यक्तींना दिली. हा अनोखा प्रकार पाहून त्यांना वेगळा आनंद झाला. त्यांनी याबाबतची माहिती दैनिक पुढारीला दिली.
दरम्यान, याबाबत अधिक माहितीसाठी सावंतवाडी पंचायत समिती तालुका कृषी विभागाचे अधिकारी प्रशांत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एका केळीच्या रोपाला एकच केळफुल किंवा घड येतो. केळी पक्व होण्यासाठी हे केळफुल काढणे आवश्यक आहे. त्याचा वापर हा भाजीसाठी केला जातो. कारिवडे येथे घडलेला
प्रकार हा अपवादात्मक असून, जनन प्रक्रियेत बदल झाल्यामुळे हा प्रकार घडून येतो. त्याला निसर्गाचा चमत्कार म्हणणे योग्य ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.