कणकवली; पुढारी वृत्तसेवा : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला खरा, पण या मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी मिळून काम प्रत्यक्षात काम सुरू होईपर्यंत तरी किमान असलेला मार्ग वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवणे ही महामार्ग प्राधिकरणची जबाबदारी आहे.

प्राधिकरणने या मार्गाच्या काँक्रिट दुपदरीकरणाचा सुमारे 300 कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून वर्षे उलटले तरी त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ते काम मंजूर होईपर्यंत तरी या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे यासाठी सुमारे 4 कोटींचा प्रस्ताव कोकण भवन कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, तोही त्या ठिकाणी प्रलंबितच आहे. परंतु सद्य:स्थितीत तळेरे ते गगनबावडा या सुमारे 35 कि.मी.च्या टप्प्यातील अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. वाहनचालकांचे हाल सुरूच आहेत.

दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेले राज्यमार्ग जोडून त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये तळेरे गगनबावडा-कोल्हापूर या मार्गाचा समावेश करण्यात आला. त्यानंतर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर गेले दोन वर्षे या रस्त्याची फारशी डागडुजी झालीच नाही. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर ऊस आणि अवजड वाहतूक होते. कोल्हापूरवरुन कोकणात येताना याच मार्गाला वाहनचालकांचे प्राधान्य असते. मात्र, जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे हा मार्ग सध्या डेंजर झोनमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन देत महामार्ग प्राधिकरणचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात मुरुम मातीने हे खड्डे बुजवण्यात आले. मात्र, त्यांचे आयुष्य अल्पायुषी ठरले असून या खड्डयांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे वाहनचालकांची फार कसरत होत आहे.

महामार्ग प्राधिकरणने या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर तळेरेगगनबावडा-कोल्हापूर या मार्गाचा काँक्रिटीकरण दुपदरीकरणाचा सुमारे 300 कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे. यामध्ये या घाटमार्गाची रुंदी वाढणार असून संरक्षक कठडे, गटारे, संरक्षक भिंती अशी अनेक कामे केली जाणार आहेत. मात्र, तो प्रस्ताव सध्या तरी प्रलंबितच आहे. मात्र, सध्या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने असलेला रस्ता सुस्थितीत ठेवण्यासाठी तळेरे ते गगनबावडा या 35 कि.मीच्या डांबरीकरणासाठी सुमारे 4 कोटींचा प्रस्ताव प्राधिकरणच्या कोकणभवन कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, तोही लालफितीत अडकला आहे. एकीकडे मूळ प्रस्तावालाही विलंब होत असताना डांबरीकरण मंजुरीलाही वेळ लागत असल्याने वाहनचालक आणि जनतेचा रोष प्राधिकरणला सहन करावा लागत आहे. एकूणच काय राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळूनही तळेरे-गगनबावडा मार्गाची दुरवस्था कायम आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here