चिपळूण, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबस्ते येथे कंटेनरमध्ये 25 लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू सापडली असतानाच पुन्हा एकदा कळंबस्ते गमरेवाडी येथे एका घरात गोवा बनावटीच्या दारूच्या गोडावूनवर पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी राजाराम जोईल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला टेबल जामीन देऊन सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बुधवारी रात्री कळंबस्ते येथे गमरेवाडी येथील घरात सुमारे 4 लाख 72 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू येथील पोलिसांनी जप्त केली राजाराम तानाजी जोईल (50, रा. पागनाका, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद पोलिस नाईक कृष्णा दराडे यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चिपळूण पोलिसांनी गुटखा व गांजा विक्रीविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. यामध्ये चिपळुणात लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. याप्रकरणी काहींना अटकही करण्यात आली. तसेच वालोपे रेल्वे स्टेशन परिसरात गांजा विक्रीचा प्रकार उघडकीस आणला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह पथकाने कळंबस्ते येथे सापळा रचून कारवाई केली. ही धाड ताजी असतानाच आता एका घरात पूर्णपणे गोवा बनावटीचे मद्य साठवून ठेवल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी बुधवारी रात्री 9:30 च्या सुमारास कळंबस्ते येथील मधुकर गमरे यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी या कारवाईत सुमारे गोवा बनावटीच्या दारूचा साठा आढळून आला. ज्या घरात गोवा बनावटी दारूचा साठा सापडला ते घर जोईलने भाड्याने घेतले होते, अशी माहिती पुढे येत आहे. तर सलग दुसर्‍यांदा कारवाईवरून चिपळुणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक मोहीतकुमार गर्ग यांच्या बदलीनंतर चिपळुणातील अवैध प्रकार उघडकीस येत आहेत. गोवा गुटख्याची तस्करी, गांजा विक्री तर आता गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी हे गैरप्रकार समोर आले आहेत. त्यामुळे याआधी पोलिसांनी या कारवाया का केल्या नाहीत? असा सवाल उपस्थित होत असून नूतन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी चिपळुणातील काळे धंदे उजेडात आणावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here