
चिपळूण/पाटण; पुढारी वृत्तसेवा : सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये पोफळीच्या पूर्वेला दिसणार्या धबधब्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. हे पाणी कोयना वीज प्रकल्पाच्या बोगद्यातून गळती होऊन पर्वतरांगेतून वाहत येत वाशिष्ठी नदीला मिळत आहे, अशाप्रकारचे माध्यमांत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र, यामध्ये कोणताही धोका नसून, हे पाणी प्रकल्पातील उल्लोळ विहीर किंवा पोफळीतील सर्जवेलला गळती लागून पुढे ईव्हीटीमध्ये येऊन झिरपत असून, तेच पाणी सह्याद्रीच्या डोंगरातून वाहत आहे, असे ‘जलसंपदा’च्या बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात कोयना वीज प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची दै. ‘पुढारी’ने खातरजमा केली. यावेळी त्यांनी या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून जे अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेल निघते, या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्जवेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी पहिल्या व दुसर्या टप्प्याच्या वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल 1960 साली बांधून पूर्ण झाली असून, ती सह्याद्रीच्या कातळात 100 मीटर खोल खोदलेली आहे.
या विहिरीला अर्ध्या मीटर रुंदीचे काँक्रीट अस्तरीकरण केलेले आहे. ही विहीर गेली साठ वर्षे असून, तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत. मात्र, आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे ‘सर्जवेल’मधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल (ईव्हीटी) किंवा आपत्कालीन झडपद्वारे भुयारामध्ये जाते आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडत आहे. गेली चार ते पाच वर्षे हा प्रकार सुरू आहे. यामुळे वीजगृहाला व कोयना जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही. केवळ पाणी वाया जाते आहे. हे पाणी साधारणत: तीन घनफूट प्रतिसेकंद एवढे पाणी असावे, असे मोडक यांनी सांगितले.