
दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : दोडामार्ग तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून अजय शंकर जाधव (23, ता. सावंतवाडी) या तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून संशयित अजय यास ताब्यात घेतले. त्याल जिल्हा न्यायालयात हजर केले असता 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फक्त 20 दिवसांत तालुक्यात अशा प्रकारची दुसरी घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे.
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी 4 नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या घरच्यांनी येथील पोलिस ठाण्यात गुरुवारी दिली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी, सहा. पोलिस निरीक्षक जयेश ठाकूर, हेडकॉन्स्टेबल रामचंद्र मळगावकर, कॉन्स्टेबल तनुजा हरमळकर व टीमने त्या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी रात्री ती मुलगी एका तरुणासोबत एका मोठ्या बाजारपेठेतील बसस्थानकावर असल्याची गुप्त वार्ता पोलिसांना मिळाली. पोलिस लागलीच तेथे रवाना होत त्या अल्पवयीन मुलीला तरुणासोबत पोलिस ठाण्यात आणले. तसेच मुलगी मिळाल्याची माहिती तिच्या घरच्यांना देण्यात आली.