
दापोली; पुढारी वृत्तसेवा : मंडणगड वेळास समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या समुद्री कासव मादीने पहिले घरटे तयार केले असल्याचे कासवमित्र देवेंद्र पाटील यांना आढळून आले. या घरट्यामध्ये मादी कासवाने 102 अंडी दिली आहेत. विणीच्या हंगामास सुरुवात झाल्याने कासवमित्र, वनकर्मचारी व वन्यप्राणी मित्र यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
वेळास येथील हे घरटे यंदाच्या वर्षातील महाराष्ट्रातील पहिलेच घरटे आहे. मागील वर्षी 2021-22 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील समुद्रकिनारी एकूण 14 हॅचरीमधून ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यात येऊन एकूण 317 घरटी मिळाली होती. या घरट्यांमध्ये 33 हजार 609 अंडी मिळून आली होती. मिळालेल्या घरट्यांचे व अंड्याचे कासवमित्रांकडून संरक्षण व संवर्धन करून 12 हजार 14 इतकी ऑलिव्ह रिडले समुद्र कासवांची पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली होती.
मागील दोन वर्षे अरबी समुद्रामध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळ व तौक्ते चक्रीवादळ यामुळे ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचा विणीचा हंगाम पुढे जाऊन त्यांची सुरुवात डिसेंबरमध्ये झाली होती. यावर्षी समुद्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक हालचाली झाल्या नसल्यामुळे नेहमीप्रमणे ऑलिव्ह रिडले समुद्री कासव विणीच्या हंगामास नोव्हेंबरमध्ये सुरुवात झाली आहे. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन व संरक्षणाचे काम, विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहायक वन संरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग रत्नागिरी चिपळूण व कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात झाली आहे. परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे यांनी वेळास येथील कासवमित्रांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
खड्डा खणून कासव घालते अंडी
अंडी घालण्यासाठी मादी सहसा रात्रीची वेळ निवडते. भरतीरेषेच्या पलीकडची जागा ती त्यासाठी निवडते. पायांनी जमिनीत किंवा वाळूत खोल खड्डा खणून त्यात अंडी घालते आणि माती, वाळू किंवा वनस्पतींनी अंडी झाकते. अंडी वाटोळी असून, सागरी कासवाच्या अंड्यांचे कवच चर्मपत्रासारखे चिवट व लवचिक असते.
कासवाच्या घरट्याच्या नोंदी अॅपवर
यावर्षी कासव विणीच्या हंगामात अंड्यांचे संवर्धन करण्यासाठी कासव मित्रांची मार्गदर्शनपर कार्यशाळा दापोलीत घेण्यात आली. यावर्षीपासून कासवमित्र हे घरट्यांच्या नोंदी एम टर्टल अॅपमध्ये नोंदवतील. यासंदर्भात कासव मित्रांना तज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात आले असून, यामुळे कासवांच्या घरट्यांची आणि त्यातून बाहेर पडणार्या पिल्लांच्या संख्येची अचूक नोंद होण्यामध्ये सुसूत्रता येईल.