पनवेल; पुढारी वृत्तसेवा : पनवेल तालुक्यातील तारागाव हद्दीत लाल रंगाच्या कारमध्ये पॅरोलवर सुटलेल्या संजय मारुती कार्ले (वय ४५)  याचा मृतदेह १८ नोव्हेंबर रोजी आढळून आला होता. गोळ्या झाडून त्‍याचा खून झाल्‍याचे पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले होते. पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

कार्ले यांच्यावर तळेगाव-दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीसह मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असून, सहा महिन्यांपूर्वी तो पॅरोलवर बाहेर आला होता. पुणे मधील तळेगाव दाभाडे भागात राहणारा संजय कार्ले हा १८ नोव्हेंबर रोजी सकाळी कामानिमित्त मुंबईला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पनवेल तालुक्यातील तारागाव हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत एका लाल रंगाच्या कार आढळून आली.  काही लोकांनी कारची पाहणी केली. कारमध्ये मृतदेह असल्‍याचे आढळले.

या घटनेची माहिती मिळाताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारच्या काच फोडून मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक तपासात तीन गोळ्या झाडून कार्ले याचा खून केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्याचा मृतदेह कारच्या दोन्ही सीटमध्ये ठेवण्‍यात आला होता. संजय कार्ले याने अनेकांची फसवणूक केली होती. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. सहा महिन्यांपूर्वीच त्‍याची पॅरोलवर सुटका झाली होती.

हेही वाचा : 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here