कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : शेअर बाजारात पैसे गु़ंतवणूक केली की जास्त पैसे मिळतील, अशी बतावणी करून निवती येथील एकाची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणातील पाच लाख हडप केलेल्या जोयेश कुमार शाहु याला निवती पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पाच महिन्यानंतर पोलिसांना संशयित आरोपीचा छडा लावण्यात यश आले आहे. ही घटना जुलै २०२२ मध्ये घडली होती.

या घटनेची फिर्याद पार्थ शाम सारंग (रा निवती, मेढा) यांनी निवती पोलिसांत दिली होती. फिर्यादीनुसार जुलै २०२२ मध्ये निवती पोलीस ठाणे येथे याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीत जोयेश कुमार शाहु (वय २० वर्षे, रा वसंत विहार बुरला) याने पार्थ सारंग याची फेसबुक आणि व्हाँटसपवरुन प्रथम ओळख केली. आपणास शेअर बाजार बाबत माहिती असून आपण शेअर बाजारात पैसे गुंतवणूक केले की जास्त पैसे मिळतील, असे सांगितले. तसेच संशयित आरोपीत याने फिर्यादीला आर्थिक फायद्याचे आमिष दाखविले. त्यामुळे संशयित जोयेश शाहु याच्यावर विश्वास ठेवून आरोपी सांगेल त्या प्रमाणे अकाउंट वर फिर्यादी सारंग यांनी पाच लाख रुपये भरले. त्यानंतर पार्थ सारंग याची आरोपीत जोयेश शाहू यांने फसवणूक केल्याचे लक्षात आले.

यानंतर फिर्यादी पार्थ सारंग याने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या सशंयिताचा शोध घेण्यासाठी व तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक एस. आर. राणे यांनी सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे यांच्या नेतृत्वात पथक नेमले होते. या पथकाने ओडिशा येथे जाऊन बुरला पोलीस ठाणे, संबलपूर ओडिशा येथे जाऊन तेथील पोलिसांची मदत घेवून आरोपीचा शोध घेतला.

प्रथम संशयित आरोपी शाहु याच्या घरातील लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पो.उ.नि संकेत पगडे पोलीस हवालदार प्रदीप गोसावी, विक्रांत तुळसकर यांनी पोलीस कौशल्य वापरून व बुरला पोलिसांनी गोपनीय माहिती काढल्यावर आरोपी जोयेश कुमार शाहू बाजुला लपून बसल्याचे समजले. यावेळी आरोपी शाहु याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here