जालना : जालना शहराजवळील एका गावात शनिवारी विनापरवाना रेड्यांची टक्कर लावण्यात आली होती. ही टक्कर बघण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र टक्कर सुरू असतानाच गर्दीला पाहून एक रेडा सैरावैरा धावत सुटला. प्रतिस्पर्धी रेड्याचा पाठलाग करण्यासाठी उधळलेल्या एका रेड्याने मग गर्दीत अनेकांना धडक देत जखमी केले आणि स्वतः देखील घसरून पडला.
उत्साही कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवलेल्या या टक्करींवेळी उधळलेल्या रेड्याने मात्र बऱ्याच जणांना लोळवून बघ्यांना वाढदिवसाची चांगलीच अनोखी भेट दिल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
दरम्यान, जालना शहराच्या चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत या रेड्याच्या टक्करी झाल्या. मात्र पोलिसांनाही या घटनेचा थांगपत्ता नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.