तमिना आणि तिचा मित्र सचिन यांनी शनिवारी रात्री १० वाजता गोव्यातील मापुसाहून आत्माराम ट्रॅव्हल्सची बस पकडली. तमिनाला पोटदुखीचा त्रास सुरू होता. ती काहीच खात नव्हती. त्यामुळे सचिननं तिच्या आईला फोन केला. तिनं तमिनाला चहा देण्यास सांगितलं. रविवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास बस साताऱ्यात थांबली. त्यावेळी सचिन हॉटेलमधून चहा घेण्यास खाली उतरला. तो पुन्हा बसमध्ये गेला. तेव्हा त्याला बसचा वाहक योगेश तमिनाला सीपीआर देताना दिसला.
‘मी योगेशला जवळच्या रुग्णालयात बस नेण्यास सांगितलं. मात्र त्यानं माझ्या कानशिलात दिली आणि मला खेचून चालकाच्या केबिनमध्ये घेऊन गेला. मला तिथेच बसवून ठेवलं. माझ्यामुळेच तमिनाला त्रास झाल्याचा आरोप करत त्यांनी बस पोलीस स्टेशनला नेणार असल्याचं म्हटलं. काही तासांनी त्यांनी बस नेरुळमधील पोलीस चौकीत नेली. तिथून मी तमिनाला वाशीतील एनएमएमसी रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं,’ असा घटनाक्रम सचिननं सांगितला.
या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकरणात काही असाधारण गोष्टी पाहायला मिळत असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. ‘रविवारी सकाळपासून तरुणीला त्रास होता. ती प्रतिसाद देत नव्हती, असं तिच्या मित्रानं सांगितलं. मात्र तरीही बस चालक आणि वाहकानं तिला रुग्णालयात नेलं नाही. बसमधील कोणीच याला आक्षेप नोंदवला. ही गोष्ट विचित्र वाटते,’ असं निरीक्षण तपास करणाऱ्या पोलिसांनी नोंदवलं.
तरुणीचा गोव्यात अपघात झाला होता. तिला डॉक्टरकडे नेण्यात आलं होतं, असं तिची आई आणि मित्र सांगतो. त्या डॉक्टरांनी कोणत्या पद्धतीचे उपचार केले, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. सोमवारी शवविच्छेदन करण्यात आलं. मृत्यूचं प्राथमिक कारण डोक्याला झालेली दुखापत असल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे.