प्रवाशांचे प्रचंड हाल
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी ‘रिक्षा बंद’चा फटका नागरिकांना सोमवारी बसला. ‘पीएमपी’ने अतिरिक्त १०० गाड्या सोडल्या, तरी त्या खचाखच भरून येत होत्या. नागरिकांना प्रवासासाठी वाहन न मिळाल्यामुळे बराच वेळ ताटकळत थांबावे लागले. काही ठिकाणी खासगी वाहनचालकांकडून जास्त पैसे आकारल्याच्या घटना घडल्या. या रिक्षा बंद आंदोलनात काही संघटनांनी भाग घेतला नसला, तरी त्यांनी भीतीने रिक्षा सुरू ठेवल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खूपच कमी रिक्षा दिसत होत्या.
रिक्षा बंदमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. बाइक टॅक्सी बंद व्हावी, रिक्षा परमिट बंद करावे, अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा संघटनांकडून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, बाहेरगावी जाणारे व येणारे प्रवासी यांना बसला. अनेकांनी पीएमपी बसचा आधार घेतला; पण सकाळी पीएमपी बसमध्ये गर्दी असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले; तसेच परराज्यांतून आणि जिल्ह्यातून रेल्वेने आलेल्या नागरिकांना रेल्वे स्थानकावर रिक्षा आणि कॅब नसल्यामुळे तासन् तास ताटकळत उभे राहावे लागत होते. ओला आणि उबेर रिक्षाचालकांनीदेखील बंदमध्ये सहभाग घेतल्यामुळे प्रवाशांना खासगी कॅब शिवाय पर्याय नव्हता; पण कॅबलाही जास्त मागणी असल्यामुळे कॅबही उपलब्ध होत नव्हत्या.
या आंदोलनातून काही रिक्षा संघटनांनी माघार घेतली होती; पण रिक्षाचालकांना दमदाटी करून रिक्षा फोडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी प्रवाशांना रिक्षातून उतरवून देण्यात आल्याच्या घटना घडल्या. रिक्षा बंद असल्यामुळे पीएमपीच्या बसमध्ये मोठी गर्दी होती. सोमवारी विवाहाची तारीख असल्यामुळे अनेकजण बाहेरून आले होते. त्यांनादेखील रिक्षा बंदचा फटका बसला.