मुंबई: राज्यातील, विशेषत: मुंबईतील कोविड मृत्यूच्या आकडेवारीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नावच घेत नाहीत. मृत्यूच्या दाखल्यावर देण्यात येणाऱ्या संशयित कोविड मृत्यू (Suspected Covid) या शेऱ्यावरून आता विरोधकांनी मुंबई महापालिकेला घेरलं आहे.

भाजपचे आमदार यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. ‘संशयित कोविड’ मृत्यू या शेऱ्याचा नेमका अर्थ काय आहे, याचा योग्य तो खुलासा मुंबई महापालिकेनं करायला हवा,’ अशी मागणी नीतेश राणे यांनी केली आहे. ‘करोनाच्या मृत्यूचे आकडे लपवण्याचा हा हुकूमी मार्ग दिसतो आहे. ‘संशयित कोविड’ असं लिहून अनेक मृत्यू आतापर्यंत लपवण्यात आले आहेत. हे सगळं करून मुंबईतील मृत्यूचा दर घटल्याचं श्रेय महापालिका मोठ्या हुशारीनं घेत आहे. म्हणजे पुरती ‘गोलमाल गँग’ आहे,’ असा आरोपही नीतेश यांनी केला आहे.

मुंबईतील करोना रुग्णांच्या संख्येनं रविवारी १ लाखांचा टप्पा पार केला आहे. तर, महाराष्ट्रात हा आकडा ३ लाखांच्या पुढं गेला आहे. आकडे वाढत असले तरी करोना मृत्यूचा दर कमी असल्याचं प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. विरोधकांना मात्र रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे आकडे दोन्हीवर संशय आहे. भाजपचे नेते सातत्यानं त्याबाबत बोलत असतात. मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेकडं असल्यानं इथल्या परिस्थितीवर विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे. मुंबईतील आकडे लपवले जात असल्याचा आरोपही भाजपनं अनेकदा केला आहे.

‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत मात्र भारतातील महानगरांपैकी केवळ मुंबई शहरातील करोनाचे खरे आकडे सांगितले जात असल्याचं म्हटलं आहे. आमदार नीतेश राणे यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या या माहितीलाही आक्षेप घेतला आहे. ‘या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना ही माहिती कुठून मिळाली की कार्यालयात बसूनच त्यांनी टेबल स्टोरी केली,’ असा प्रश्न नीतेश यांनी केला होता. त्यानंतर आज नव्या मुद्द्यावरून त्यांनी महापालिकेला लक्ष्य केलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here