टी-२० संघाचं नेतृत्त्व हार्दिक पांड्याकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या आयपीएलमध्ये पांड्यानं गुजरात टायटन्सचं नेतृत्त्व केलं. पहिल्यांदाच नेतृत्त्व करत असलेल्या पांड्यानं संघाला जेतेपद मिळवून दिलं. त्यामुळे टी-२० संघाचं नेतृत्त्व पांड्याकडे दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि कसोटी संघाची सुत्रं कायम राहतील.
सध्या राहुल द्रविड तिन्ही प्रकारात संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. मात्र टी-२० संघाला स्पेशालिस्ट कोच मिळू शकतो. वरिष्ठ खेळाडूंनी एकदिवसीय आणि कसोटीवरच लक्ष केंद्रीत करावं असं बीसीसीआयला वाटतं. त्यामुळे टी-२० मध्ये तरुणांना संधी मिळेल. पुढच्या वर्षभरात युवांना टी-२० मध्ये जास्तीत जास्त संधी देण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.
बीसीसीआय कधीच कोणाचा निवृत्ती घेण्यास सांगत नाही. तो प्रत्येक खेळाडूचा निर्णय आहे. मात्र २०२३ मध्ये भारतीय संघाला मोजकेच टी-२० सामने खेळता येणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ खेळाडू एकदिवसीय आणि कसोटीवर लक्ष केंद्रीत करतील, असं बीसीसीआयमधील उच्चपदस्थ सुत्रांनी सांगितलं. तुम्हाला निवृत्ती जाहीर करायची नसेल तर करू नका. पण तुम्हाला पुढील वर्षी बरेचसे वरिष्ठ खेळाडू टी-२० खेळताना दिसणार नाहीत, असं सूचक विधान त्यांनी केलं.