काय आहे ‘रॅपिडो’ वाद

‘रॅपिडो’ने पुण्यात त्यांची बाईक-टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. कंपनीने सांगितलं होतं, की आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा एक भाग म्हणून पुढील दोन वर्षात दोन लाख दुचाकी चालक या रॅपिडोशी जोडले जातील. मात्र, महाराष्ट्राच्या मोटार वाहन विभागाने या सेवेसाठी कंपनीला परवानगी दिली नसून ती बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. मुंबईच्या परिवहन विभागाने ‘रॅपिडो’ या अॅप आधारित बाइक-टॅक्सी सेवा कंपनीला तातडीने सेवा बंद करण्यास सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने अद्याप कंपनीला अशा प्रकारे व्यवसाय करण्याची परवानगी दिलेली नाही.
RTO ची कारवाई

काही दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांद्वारा बाईक-टॅक्सी अॅप Rapido च्या १२० हून अधिक बाईक जप्त केल्याची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता पुण्यातही काही अशीच कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर RTO कडून ६५ बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. ऑटो रिक्षा असोसिएशनने रॅपिडो बाईक टॅक्सी अॅपचा वापर करून प्रवाशांना नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुचाकींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Rapido बेकायदेशीर असल्याचा दावा

ऑटो रिक्षा संघटनांनी अॅपला विरोध केल्यानंतर पोलिस आणि अधिकारी रॅपिडो बाईकवर कारवाई करत आहेत. RTO ने शहरातील विविध भागातील ६५ बाईक जप्त केल्या. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी हे आंदोलन भविष्यातही सुरू ठेवण्याचं ऑटो रिक्षा संघटनेला सांगितलं आहे. शिंदे यांनी प्रवाशांना प्रवासासाठी असुरक्षित आणि बेकायदेशीर असणाऱ्या ‘रॅपिडो’ बाईक सेवेचा वापर करू नये, असं आवाहन केलं आहे.
‘रॅपिडो’च्या अधिकाऱ्यांचं काय आहे म्हणणं?

रॅपिडोचे सह-संस्थापक पवन गुंटुपल्ली यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. रॅपिडो बाईक- टॅक्सी चालवणाऱ्यांना कोणत्याही वैध कारणाशिवाय त्रास दिला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑटो रिक्षा चालक रॅपिडो बाईक – टॅक्सीच्या स्पर्धेला विरोध करत आहेत. रॅपिडो ही एक कायद्याचं पालन करणारी कंपनी आहे आणि कायद्याच्या मर्यादेत कार्यरत आहे. रॅपिडो सेवा ज्या राज्यांमध्ये अस्तित्वात आहे त्या सर्व राज्यांमध्ये ती नियमित कर भरणारी संस्था असल्याचंही ते म्हणाले.
कंपनीवर गुन्हा दाखल

परवाना नसताना ‘रॅपिडो’ नावाने बाईक-टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीला ही सेवा बंद करण्यासाठी आरटीओने तीन वेळा नोटिस पाठवली होती. परंतु त्यावर कोणतीही पावलं उचलली गेली नसल्याने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०२१ पासून सुरू असलेल्या या ‘रॅपिडो’विरोधात रिक्षा चालकांनी बेमुदत आंदोलन केलं आहे. ‘रॅपिडो’विरोधात गुन्हा दाखल झाला असला, तरी कंपनीचं App सुरू असल्याने ही सेवाही सुरू आहे. त्यामुळे App बंद होईपर्यंत संप सुरू राहणार असल्याची रिक्षा चालकांची भूमिका आहे. रिक्षा चालक आणि रॅपिडो बाईक-टॅक्सी यांच्या वादात सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो आहे.