parbhani local news, महाविद्यालयाच्या छतावर कामानिमित्त गेले, तोल गेल्याने ४५ वर्षीय व्यक्तीचा करुण अंत – 45 year old man dies after tripping on college roof in parbhani
परभणी : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मुडा गावातील कृषी महाविद्यालयाच्या छतावरुन तोल गेल्यामुळे खाली कोसळून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मुडा गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, खोब्राजी बनसोडे हे बोरी येथील कापड दुकानावर गेल्या २० वर्षांपासून काम करत होते. ते मुडा येथील कृषी विद्यालयाच्या छतावर गेलेले असताना तोल जाऊन ते खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे तेथे उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मयताचे बंधू भास्कर रंगनाथराव बनसोडे यांच्या फिर्यादीवरुन बोरी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुण्यात रिक्षा संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला, बाइक टॅक्सीवर कारवाईची मागणी
मृत खोब्राजी बनसोडे यांचे शवविच्छेदव बोरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक वसंत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक संजय काळे, एस.आर. कोकाटे, अनिल शिंदे. पांडुरंग तूपसुंदर करत आहेत. या घटनेमुळे बोरी बाजारपेठेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. खोब्राजी बनसोडे यांच्यावर मुडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, आई-वडील भाऊ, मुलगा. मुलगी असा परिवार आहे.