नवी दिल्ली : नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) १ डिसेंबरपासून रिटेल डिजिटल रुपी लाँच करण्याची घोषणा केली असून किरकोळ डिजिटल चलनासाठी हा पहिला पायलट प्रोजेक्ट असेल. पायलट मोहिमेदरम्यान, डिजिटल रुपयाच्या उत्पादन, वितरण आणि किरकोळ वापराच्या संपूर्ण प्रक्रियेची चाचणी केली जाईल. यापूर्वी, केंद्रीय बँकेने १ नोव्हेंबर रोजी घाऊक व्यवहारांसाठी डिजिटल रुपया लाँच केला होता.

मंगळवारी जाहीर केलेल्या निवेदनात रिझर्व्ह बँकेने सांगितले की, वापरकर्ते सहभागी बँकांद्वारे ऑफर केलेल्या आणि मोबाईल फोन/डिव्हाइसवर संग्रहित डिजिटल वॉलेटद्वारे डिजिटल रुपया किंवा ई-रुपीसह व्यवहार करू शकतील. तर ई-रुपी (e₹-R) डिजिटल टोकन म्हणून काम करेल. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) हे भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या चलनी नोटांचे डिजिटल स्वरूप असून चलनी नोटांप्रमाणे पूर्णपणे वैध आहे. त्याचा वापर व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो.

RBI चा डिजिटल रूपया लवकरच लॉंच होणार; जाणून घ्या याचे फायदे, तुमच्या पेमेंटवर काय परिणाम होईल

८ बँकांची निवड
दरम्यान, या पायलटमध्ये टप्प्याटप्प्याने सहभागी होण्यासाठी आठ बँकांची निवड करण्यात आली आहे. पहिला टप्पा देशभरातील चार शहरांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), आयसीआयसीआय बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या चार बँकांसह सुरू होईल. आणखी चार बँका – बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक – त्यानंतर या पायलटमध्ये, विधानानुसार साविष्ट होतील.

देशात डिजिटल रुपया लाँच, कसं काम करेल E-Rupee

रिझर्व्ह बँकेची कल्पना काय?
पेमेंटसाठी आणखी एक पर्याय सीबीडीसी-सेंट्रल बँक डिजिटल करन्सीमुळे निर्माण होईल. सध्याच्या पेमेंट प्रणाली पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहील. सीबीडीसी म्हणजे डिजिटल स्वरूपातील करन्सी नोटा होय. जगभरातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सीबीडीसीची चाचपणी सुरू आहे. प्रत्येक देशाच्या गरजांनुसार त्या-त्या देशाचे सीबीडीसी आणलं जाणार आहे. ६०हून अधिक देशांच्या मध्यवर्ती बँका सीबीडीसी आणण्याच्या तयारीत आहेत.

डिजिटल रुपया म्हणजे काय?
ई-रुपी
डिजिटल रुपया प्रत्यक्षात व्यवहारात आला आहे. १ फेब्रुवारी २०२२ रोजी २०२२ -२३ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्याची घोषणा केली होती. तेव्हापासून त्याच्या संभाव्य रुपाबद्दल आणि त्याच्या जारी होण्याच्या संभाव्य तारखेबद्दल बरीच चर्चा सुरु होती. या सर्व चर्चेला पूर्णविराम देत आता डिजिटल रुपया अस्तित्वात आला आहे.

क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळे कसे
डिजिटल चलन आणि क्रिप्टोकरन्सी यामध्ये मोठा फरक आहे. सर्वात मोठा फरक म्हणॆ की डिजिटल चलन, ज्या देशाची केंद्रीय बँक जारी करते त्या देशाच्या सरकारद्वारे ते मान्यताप्राप्त असते. त्यामुळे यात कोणताही धोका नाही. हे जारी करणार्‍या देशात खरेदीसाठी वापरले जाऊ शकते. दुसरीकडे, क्रिप्टोकरन्सी ही एक विनामूल्य डिजिटल मालमत्ता आहे. हे कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेश सरकारच्या अधिकारक्षेत्रात किंवा नियंत्रणाखाली नाही. बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी विकेंद्रित आहेत आणि त्या कोणत्याही सरकारी किंवा सरकारी घटकाशी संबंधित नाहीत.

कसा होईल व्यवहार
ब्लॉकचेन तंत्रज्ञान (Blockchain Technology) आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल रुपयाची ओळख करून दिली जाईल. यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेलच पण चलन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि कमी खर्चिक करेल. घाऊक चलनाचा वापर वित्तीय संस्थांकडून केला जातो, तर किरकोळ डिजिटल चलनाचा वापर सामान्य लोक आणि कंपन्या करतात. ब्लॉकचेन तंत्रज्ञान विकेंद्रित असतो, ज्याचा अर्थ असा की नेटवर्कमधील सर्व संगणकांवर सर्व प्रकारची माहिती दिसते. मात्र डिजिटल रुपयाचा व्यवहार करताना सहाजिकच त्याचे नियमन मध्यवर्ती बँकेकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हे चलन मोबाईलवरुन सहज एकमेकांना पाठवता येईल आणि त्याचा व्यवहारात वापर करताना धोका राहणार नाही. तसेच खरेदीसाठी, प्रवासासाठी आणि सर्व सुविधा-सोयींसाठी हा डिजिटल रुपया वापरता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here