आता मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यावरही पावसाचे सावट आहे. पावसामुळे हा सामनाही खेळवला गेली नाही तर त्याचा फायदा न्यूझीलंडला होईल. कारण न्यूझीलंड मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. सामना झाला तर कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वात हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारताचा पुरेपूर प्रयत्न असेल.
क्राइस्टचर्चमध्ये पावसाची शक्यता ७६ टक्के
हवामान अंदाजानुसार क्राइस्टचर्चमध्ये पावसाची शक्यता ही ७६ टक्के आहे. असं झाल्यास पावसामुळे सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. क्राइस्टचर्चमध्ये कमाल तापमान हे १८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी ढग गोळा होण्याची शक्यता ८७ टक्के आहे.
कशी आहे मैदानाची खेळपट्टी?
क्राइस्टचर्चमधील सामन्यात भारतीय फलंदाजांची अग्निपरीक्षा असेल. क्राइस्टचर्चमधील हेगले ओवल मैदान हे पारंपरिक चेंडू स्विंग करणाऱ्या गोलंदाजांसाठी मदतगार आहे. गेल्या काही वर्षात या मदानावरील डावसंख्याही २३० पर्यंत राहिली आहे. यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजांना आपली उत्तम कामगिरी दाखवावी लागणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात स्थान निश्चित करणाऱ्यासाठी खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.