health department tukaram mundhe | राज्याच्या विविध भागात दौरे, जबाबदारी व्यवस्थितपणे पार न पाडणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना खडसावलं. परिणामी काही अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या, मंत्र्यांनी तुकाराम मुंढेंना सूचना केल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर आज तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या बदलीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे

 

हायलाइट्स:

  • वरिष्ठ डॉक्टरांची लॉबी नाराज
  • तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारी
मुंबई: कठोर शिस्तीचे अधिकारी म्हणून दरारा असलेल्या तुकाराम मुंढे यांची मंगळवारी कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून बदली करण्यात आली. त्यानंतर तुकाराम मुंढे कोणत्या खात्यात जाणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, अवघ्या ५९ दिवसांत तुकाराम मुंढे यांची कुटुंब कल्याण विभागातून बदली झाल्याने पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची नाराजी हे तुकाराम मुंढे यांच्या बदलीमागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुकाराम मुंढे यांची कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदी नियुक्ती केली. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. तेव्हाच तानाजी सावंत यांनी विरोध दर्शविला होता. परंतु, तेव्हा एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांची समजूत काढली होती. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कामाला सुरुवात केली होती. सामान्य जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे काम करावे, यासाठी त्यांनी कठोर नियम घालून दिले. त्यामुळे आरोग्य खात्यातील वरिष्ठ डॉक्टरांची लॉबी नाराज झाली होती. या सगळ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत तानाजी सावंत यांच्याकडे तक्रारही केली होती. मात्र, तुकाराम मुंढे यांचा आतापर्यंतचा लौकिक पाहता नियमापुढे ते मंत्री किंवा नेत्यांची पत्रास बाळगत नाहीत. याची परिणती तुकाराम मुंढे यांच्या बदलीत झाली, असे म्हणता येईल.
अधिकाऱ्यांना तंबी ते झाडाझडती, शिस्तीचा धसका ते तुकाराम मुंढेंच्या NHM मधून कार्यमुक्तीचा प्रवास
तुकाराम मुंढे यांनी कुटुंब कल्याण विभागात दोन महिन्यांमध्ये अनेक बदल करण्याचे प्रयत्न केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना रात्री-बेरात्री भेटी देण्याचे आदेश काढले. रुग्णांना 24 तास वैद्यकीय सेवा मिळून त्यांची प्रकृती सुधारावी असा हेतू आदेशांमागे होता. या सगळ्यामुळे गेल्या महिनाभरापासून कोणत्याही क्षणी तुकाराम मुंढे यांची बदली होईल, असे वातावरण असल्याची चर्चा होती. अखेर ही शक्यता खरी ठरली.

१७ वर्षांच्या कार्यकाळात तुकाराम मुंढेंची कितीवेळा बदली

तुकाराम मुंढे यांनी आयएएस अधिकारी म्हणून १७ वर्षे सेवा बजावली आहे. या काळात त्यांची जवळपास १६ वेळा बदली झाली आहे. इतक्यांदा बदली होणारे ते राज्यातील बहुतेक पहिलेच अधिकारी आहेत. आतादेखील कुटुंब कल्याण विभागातून अवघ्या ५९ दिवसांमध्ये त्यांची ट्रान्सफर झाली. तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी नांदेडमध्ये, विक्रीकर आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी राजकारण्यांच्या दबावामुळे त्यांची बदली होताना दिसली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here