जिल्ह्यात करोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने लॉकडाउनबाबत निर्णय घेण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी बैठक बोलवली होती. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत अखेर आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत आहे. समूह संसर्ग टाळण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. २२ जुलैच्या रात्रीपासून ते ३० जुलैपर्यंत महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रात लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी होईल. ग्रामीण भागातील लोकांनी स्वतःहून जनता कर्फ्यूचे पालन करावे. रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये मात्र लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करावी,’ असे आवाहन पाटील यांनी केले.
कुणालाही ताप, सर्दी ,खोकला, मळमळ, वास न येणे, मानसिक गोंधळलेली स्थिती, स्नायू दुखी आदींबाबत कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर क्लिनिक अथवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. गरोदर स्त्रिया, लहान मुले, ५० वर्षावरील नागरिकांनी अधिक सजगपणे काळजी घ्यावी. कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. वेळेवर उपचार सुरू झाल्यास पुढील संभाव्य धोका तसेच वाढणारा प्रादुर्भाव या दोन्ही बाबी टाळता येतील. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नका. काहीही लक्षणे जाणवल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. अनावश्यक गर्दी करू नका. मास्कचा वापर अनिवार्यपणे करा. सोशल डिस्टिन्सिंगचे सर्व नियम पाळा आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत काटेकोर काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, सांगलीत करोनाचा कहर सुरूच असल्याने रुग्णांचा संख्या १०१३ वर पोहोचली. यातील ४३५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, सध्या ४४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी दिवसभरात चौघांचा मृत्यू झाल्याने करोना बळींची संख्या ३३ झाली. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांपैकी १७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. शहरासह ग्रामीण भागातही संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दैनंदिन व्यवहार बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times