म. टा. प्रतिनिधी, जळगाव: शहरातील मेहरुण तलावात बेपत्ता झालेल्या तांबापुरा येथील १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह आज सोमवारी सकाळी ७ वाजता ओढणीने हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रामेश्वर कालनतील विशाल भोई या तरुणाने अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्यानतंर खून केल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.

तांबापुरातील मच्छीबाजार परिसरात राहणारी ही मुलगी आदर्शनगरातील रोहीत नाथाणी यांच्या घरी धुणीभांडी करण्याचे काम करत होती. रविवारी ती सकाळी ११ वाजता नाथाणी यांच्या घरी कामासाठी गेली. यानंतर दुपारी १२.३० वाजता विशाल भोई हा तेथे आला. सुरूवातीला त्याने नाथाणी यांच्या कुटुंबातील महिलेकडे संबधित तरुणीच्या बाबतीत विचारपूस केली. यानंतर तो निघून गेला. काही वेळात विशाल पुन्हा आल्यानंतर तरुणी बाहेर येऊन त्याला भेटली. यानंतर विशाल व तरुणी हे दोघेजण तेथून निघून गेले. दुपारी दोन वाजता तरुणीची आई तिला घेण्यासाठी नाथाणी यांच्या घरी आली. तत्पूर्वी तरुणी एका मुलासोबत दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास निघून गेल्याचे नाथाणी कुटुंबीयांनी सांगितले. सायंकाळी तरुणीच्या वडिलांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. रात्री ७.३० वाजता अज्ञात तरुणाच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आज सोमवारी सकाळी ७ वाजता या तरुणीचा मृतदेह मेहरुण तलावात आढळून आला. तिच्या डाव्या हाताला ओढणी गुंडाळलेली होती. एमआयडीसी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. या तरुणीच्या अपहरणाचा गुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल असल्याने तेथील पोलिसांनी मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेतला. या घटनेची नोंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here