दरम्यान, आई आणि चिमुकली कुत्रा समोरून आल्यामुळे दुचाकीवरून पडल्या. त्यात दिव्यांश्रीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच मामा ज्ञानेश्वर तागटे यांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला. तिला डॉक्टरांनी मृत घोषित करताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक दुचाकीला कुत्रा आडवा आल्याने चिमुकलीला नाहक आपला जीव गमवावा लागला. अपघातात माय-लेकी दीपाली आणि दिव्यांश्री या दोघींनाही जबर मार लागला होता. मात्र, दिव्यांश्रीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिची स्थिती गंभीर झाली होती. जखमी अवस्थेत आपल्या मुलीला पाहून दीपाली घाबरल्या. त्यांनी तात्काळ आपल्या भावाला कॉल करून बोलावले. रस्त्यावरील वाहनचालकांच्या मदतीने जवळच असलेल्या दवाखान्यात चिमुकलीला दाखल करण्यात आले. तोपर्यंत चिमुकली बेशुद्ध अवस्थेत गेली होती. दवाखान्यात तात्काळ तिच्यावर उपचार सुरु केले पण उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे पुन्हा एकदा नाशिकच्या विविध भागात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याआधी देखील मोकाट कुत्र्यांमुळे अपघात झाल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. अशातच आता मोकाट कुत्रा रस्त्यात आडवा आल्यानं निष्पाप जीवाचा बळी गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनपाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कराव, अशी मागणी देखील नागरिकांकडून केली जात आहे.